‘युपीएससी’मध्ये नगरचे सुपुत्र चमकले, विनायक नरवडे राज्यात दुसरा

‘युपीएससी’मध्ये नगरचे सुपुत्र चमकले, विनायक नरवडे राज्यात दुसरा विनायक कारभारी नरवडे हा नगर येथील सावेडीतील असून, त्याचे प्राथमिक शिक्षण आठरे पाटील स्कूलमध्ये, तर महाविद्यालयीन शिक्षण सारडा महाविद्यालयात पूर्ण झाले. पुढे पुणे येथून अभियांत्रिकीच्या पदवीचे शिक्षण घेऊन त्याने अमेरिकेत पदव्युत्तर पदवी पूर्ण केली व काही काळ नोकरीही केली. परंतु आयएएस अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यामुळे अभ्यासासाठी नोकरीवर पाणी सोडून तो पुन्हा मायदेशी परतला. दोन वर्षे अभ्यास केल्यानंतर पहिल्या प्रयत्नात अपयश आले. मात्र यंदाच्या परीक्षेत त्याने अखेर यशाला गवसणी घातली. विनायकने देशात ३७ वी रँक पटकावली असून, राज्यात तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

अभिषेक दिलीप दुधाळ याने युपीएससी परीक्षेत सलग दुसऱ्यांदा यश मिळविले आहे. अभिषेक हा बेलापूर (ता. श्रीरामपूर) येथील असून, त्याला ४६९ वी रँक मिळाली आहे. अभिषेकचे वडील दिलीप दुधाळ हे शिक्षक, तर आई संगीता गृहिणी आहेत.

विकास बाळासाहेब पालवे हा मूळ सोनई (ता. नेवासा) येथील असून, त्याने ५८७ वी रँक मिळवली. गेल्या चार वर्षांपासून तो युपीएससीची तयारी करीत होता. त्याचे वडील बाळासाहेब पालवे हे शिक्षक, तर आई शोभा या गृहिणी आहेत.

 सूरज गुंजाळ याने पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. त्याचे प्राथमिक शिक्षण नवनागापूर येथील गजानन कॉलनीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, माध्यमिक शिक्षण वडगाव गुप्ता येथील ज्ञानसरिता विद्यालयात, तर महाविद्यालयीन शिक्षण सारडा कॉलेज येथे झाले. पुढे पुण्यातील सिंहगड कॉलेजमधून त्याने अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली. मागील दोन वर्षांपासून तो केंद्रीय लोकसेवा आयाेगाच्या परीक्षेची तयारी करत होता. त्याचे वडील नगर एमआयडीसीतील एका कंपनीत कर्मचारी आहेत, तर आई गृहिणी आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post