चायनाची शाओमी (एमआय) कंपनीच्या अनैतिक व्यापारामुळे मोबाईल रिटेलर्स उद्ध्वस्त होण्याची भीती

 चायनाची शाओमी (एमआय) कंपनीच्या अनैतिक व्यापारामुळे मोबाईल रिटेलर्स उद्ध्वस्त होण्याची भीती

कंपनीच्या व्यापार धोरणाला ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचा तीव्र विरोध


नगर : भारतात गेल्या काही काळापासून ऑनलाईनचे प्रस्थ वाढत असून अनेक परकीय कंपन्या एफडीआयचे नियम डावलून मोबाईल रिटेलर्सची पिळवणूक करीत रिटेलर्सना उद्ध्वस्त करण्याचे काम करीत आहेत. चायनाची शाओमी (एमआय) या मोबाईल कंपनीने तर देशभरातील 20 हजारांहून अधिक पार्टनर मोबाईल रिटेलर्सची व इतर रिटेलर्सची फसवणूक चालवली आहे. ऑनलाईन व ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर सारख्या प्रमाणात माल उपलब्ध करून देण्याऐवजी कंपनी फक्त ऑनलाईन प्लॅटफॉर्मला प्राधान्य देत आहे. त्यामुळे कंपनीसमवेत पार्टनर म्हणून जोडले गेलेल्या रिटेलर्सच्या व्यवसायावर नकारात्मक परिणाम झाला आहे. कंपनीने तातडीने आपल्या अनैतिक व्यापार धोरणात बदल करण्याची मागणी ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनने केली आहे. याबाबत असोसिएशनचे राष्ट्रीय जॉइंट सेक्रेटरी नवनीतजी पाठक यांनी कंपनीच्या सिनियर डायरेक्टरांना पत्रही दिले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना असोसिएशनचे राष्ट्रीय जॉइंट सेक्रेटरी  पाठक यांनी  यांनी सांगितले की, ऑनलाईन ई कॉमर्सचे प्रस्थ वाढत असल्याने कंपन्याही भारत सरकारचे नियम डावलून याच प्लॅटफॉर्मला झुकते माप देत आहेत. त्याचा थेट परिणाम देशभरातील मोबाईल रिटेलर्सवर झालेला आहे. चायनाच्या शाओमी कंपनीने देशभरात 20 हजारांहून अधिक रिटेलर्सशी करारनामा केलेला आहे. यासाठी प्रत्येक रिटेलर्सकडून 2 लाख रुपये अनामत रक्कम घेण्यात आली तसेच बोर्डचा खर्चही घेण्यात आला. याशिवाय रिटेलर्सनी 50 टक्के विक्री शाओमी ब्रॅण्डची करायची अशीही अट घालण्यात आली. या अटीशर्ती मान्य करून करार केलेल्यांची सध्या अडवणूक करण्याचे काम कंपनीने चालवले आहे. कंपनीकडून रिटेलर्सना मालाचा पुरवठा कमी करण्यात आला आहे. त्याचवेळी अमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या ई कॉमर्स कंपन्यांना भरपूर माल दिला जातो. याशिवाय एमआयच्या स्वत:च्या स्टोअर, एमआय होम येथेही ई कॉमर्सवरील दराप्रमाणे मोबाईलची विक्री केली जाते.

 ई कॉमर्स कंपन्या तसेच एमआय होम येथे ग्राहकांना कॅशबॅक तसेच इतर ऑफर्स दिल्या जातात. हा सरळसरळ पक्षपातीपणा असून व्यापाराची नैतिकता पायदळी तुडवणारा आहे. वास्तविक केंद्र सरकारने रिटेल क्षेत्रालाही समान संधी देण्याचे धोरण आखलेले आहे. त्याची सरळसरळ पायमल्ली करण्यात येत असून अशा कंपन्यांमुळे येत्या काळात भारतातील रिटेलर व्यवसाय बुडीत जाण्याची भीती आहे. याचा थेट परिणाम रिटेल विक्रेते व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मोठ्या घटकांवर होणार आहे. कंपनीने तातडीने आपल्या धोरणात बदल करून सर्वांना समान संधी व न्याय देण्याची आवश्यकता असल्याचे पाठक यांनी म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post