धक्कादायक... उत्तर प्रदेशात आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू, शिष्य चौकशीसाठी ताब्यात

धक्कादायक...आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू, शिष्य चौकशीसाठी ताब्यात प्रयागराज : अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू झाला. आणि त्यानंतर आता अनेक गोष्टी समोर यायला सुरुवात झाली आहे. नरेंद्र गिरी हे अल्लापूरच्या बाघंबरी या ठिकाणी गळफास लावलेल्या स्थितीत आढळले होते. मात्र आता महंत नरेंद्र गिरी मृत्यू प्रकरणाला आता गंभीर वळण मिळण्याची शक्यता आहे. कारण, आधी पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली होती तर आता कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणजेच सीडीआरमधून अनेक पुरावे मिळाल्याचं सांगितलं जात आहे. मृत्यू होण्याच्या 6 ते 10 तास आधी ज्या ज्या लोकांशी नरेंद्र गिरी बोलले, त्या सर्वांची आता चौकशी होणार आहे. पोलिस तपासादरम्यान नरेंद्र गिरी महाराज यांच्या खोलीत एक सुसाईड नोट सापडली होती. ही सुसाईड नोट तब्बल 7 पानी असल्याचं कळतं आहे. तसंच या चिठ्ठीत शिष्य आनंद गिरी यांच नाव लिहिल्यानं आता आनंद गिरी यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु आहे.

दरम्यान, सुसाईड नोटच्या आधारावर नरेंद्र गिरी यांचा शिष्य आनंद गिरीची चौकशी सुरु आहे. या चौकशी दरम्यान, नरेंद्र गिरी यांनी आत्महत्या केल्याची शक्यता त्याने नाकारली आहे. तो म्हणाला की, प्रयागराजचे आयजी यात संशयित आहे, ते सतत नरेंद्र गिरी यांच्या संपर्कात असायचे. आनंद गिरीने आरोप केला की, मठ आणि मंदिराजवळ असलेली संपत्ती हडपण्यासाठी महंत नरेंद्र गिरी यांची हत्या झाली. या कटात अनेक मोठे मासे गुंतलेले असू शकतात. हा कोट्यवधींचा खेळ आहे. विशेष गोष्ट म्हणजे, नरेंद्र गिरी यांच्या सुसाईड नोटमध्ये आनंद गिरी, आद्या तिवारी आणि संदीप तिवारी यांनी मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post