नगर जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव पुन्हा चर्चेत, श्रीरामपूरातील शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

 

नगर जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव पुन्हा चर्चेत, श्रीरामपूरातील शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेटनगर: श्रीरामपुरातील आरटीओ कार्यालयाचे विभाजन करून ते संगमनेरला नेण्याचा निर्णय घेऊ नये, श्रीरामपूरच जिल्हा करावा तसेच वर्षानुवर्षे प्रलंबित असणारा आकारी पडित जमिनीचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, या मागणीसाठी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे श्रीरामपुरातील समर्थक आणि शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन दिले.

विखे समर्थक माजी आ. भाऊसाहेब कांबळे, माजी सभापती दीपक पटारे, नाना शिंदे, गिरीधर आसने, शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन बडधे, युवा सेनेचे निखील पवार आदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देत श्रीरामपूर जिल्ह्याची मागणी केली.

श्रीरामपूर हे जिल्ह्याचे मुख्यालय व्हावे म्हणून गेल्या कित्येक वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे 30 वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी स्वतः नगर जिल्हा विभाजनाची घोषणा सोनई येथील सभेत करत नवीन मुख्यालयाचे ठिकाण श्रीरामपूर राहील, असे जाहीर केले होते. मात्र त्यानंतर बरेच पाणी वाहिले. नंतर संगमनेरचे नाव पुढे करण्यात आले. श्रीरामपूर की संगमनेर? या वादात 30 वर्षे निघून गेली. मात्र जिल्ह्याचे विभाजनही झाले नाही आणि मुख्यालयाचा प्रश्नही तसाच भिजत पडला.

श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी या ठिकाणी जिल्हा कोर्ट, आरटीओ कार्यालय, एमआयडीसी, मोठी प्रशासकीय इमारत, जिल्हा उपग्रामीण रुग्णालय, एस. टी. कार्यशाळा यासह अनेक सरकारी कार्यालये कार्यान्वित आहेत. रेल्वेची सुविधा असणार्‍या श्रीरामपूर शहराच्या अगदी लगत शेती महामंडळाची शेकडो एकर जमीन जिल्हा वाढीसाठी तसेच सरकारी कार्यालये, निवासस्थानांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे श्रीरामपूरच जिल्ह्यासाठी योग्य असे ठिकाण असल्याचे या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. आरटीओ कार्यालयाचे विभाजन करून ते संगमनेरला नेण्याचा घाट घालण्यात आला आहे. श्रीरामपूर आरटीओ कार्यालयाचे विभाजन केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या शिष्टमंडळाने दिला.

निवेदनावर गिरीधर आसने, बाळासाहेब बकाल, विश्वनाथ वाघ, भाऊसाहेब बांद्रे, सुरेश गलांडे, प्रदीप कुलकर्णी आदींच्या सह्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post