पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण, कोरोनाच्या तिस-या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

 पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

कोरोनाच्या तिस-या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

संकटाच्या काळातही विकासकामांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न

जिल्ह्यात आजपासून ई-पीक पाहणी प्रकल्पास सुरुवातअहमदनगर: कोरोनाच्या तिस-या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास, कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. संकटाच्या काळातही जिल्ह्यातील विकास कामांच्या अंमलबजावणीचे प्रयत्न सुरु असून त्यासाठी राज्यस्तरावरुनही अधिकाधिक निधी मिळविण्यासाटी पाठपुरावा सुरु असल्याची माहितीही त्यांनी दिली.


स्वातंत्र्यदिनाच्या ७४ व्या वर्धापनदिनानिमित्त येथील पोलीस परेड मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा पोलीस प्रमुख मनोड पाटील, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


यावेळी पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले,  स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव आपण साजरा करत आहोत. अशावेळी स्वातंत्र्यासाठी प्राणाची बाजी लावणा-या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण आणि त्यांच्या विचारांचा वारसा सर्वांनी जपला पाहिजे. स्वातंत्र्यसैनिकांनी केलेला त्याग, देशासाठी सर्वस्व ओवाळून दिलेली प्राणाची आहूती यांचे कायम स्मरण ठेवले पाहिजे. देश स्वातंत्र्य झाल्यानंतरही अनेक आव्हानांचा सामना करत आधुनिक भारताची उभारणी करण्यासाठी स्वातंत्र्योत्तर काळात अनेकांचे योगदान राहिले. विविध क्षेत्रात आपल्या देशाने गगनभरारी घेतली. जागतिक स्तरावर एक महासत्ता म्हणून आपली नव्याने ओळख प्रस्थापित होत असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.


सध्या कोरोनाचे आव्हान आपल्यासमोर असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य शासन, जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संघटना योगदान देत आहेत. कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांचा आपण सामना केला. आता तिस-या लाटेचे संकट समोर आहे. अशावेळी सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळणे, घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणे, लक्षणे जाणवल्यास तात्काळ उपचार घेणे अशा प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या माध्यमातून आणि प्रत्येकाने योग्य ती काळजी घेत स्वताचे आरोग्य जपावे, असे आवाहन त्यांनी केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post