तिसऱ्या लाटेचे सावट... जिल्ह्यातील कोविड सेंटर सज्ज ठेवण्याचे आदेश

 *सीसीसी आणि डीसीएचसी अद्यावत करण्याचे जिल्हा प्रशासनाचे निर्देश**अहमदनगर:* जिल्हयात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व तालुकास्तरीय यंत्रणांनी कोविड केअर सेंटर (सीसीसी) आणि डिस्ट्रीक्ट कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी) अद्यावत करण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवरील कारवाई गतिमान करावी, असे निर्देशही दिले आहेत.


कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतला. उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, उर्मिला पाटील, रोहिणी नऱ्हे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बांगर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दहिफळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे आदी जिल्हा मुख्यालय येथून तर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक हे तालुका स्तरावर उपस्थित होते.


जिल्ह्याच्या काही तालुक्यात काटेकोरपणे कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन होत नसल्याने कोरोना रुग्ण संख्या पुन्हा गतीने वाढतानाचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती आणि आस्थापनांवर कडक कारवाईचे निर्देश यापूर्वीही दिले आहेत. केवळ एक दोन कारवाईपुरते मर्यादित न राहता संसर्ग साखळी तोडण्याच्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून या कार्यवाहीकडे पाहण्याची सूचना त्यांनी केली.


वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हिवरे बाजार पॅटर्न अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या समित्यांची जबाबदारी गावपातळीवर महत्वाची आहे. संसर्ग रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समित्यांनी त्यांची जबाबदारी गांभीर्याने पार पाडून गाव कोरोनामुक्त राहील, यासाठी पुढाकार घ्यावा. गावात एखादा बाधित आढळून आला तर त्याच्या संपर्कातील व्यक्तींनी स्वताहून तपासणी करुन घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी, गर्दीची ठिकाणी जाणे टाळावे. गावस्तरावरील अधिकारी-कर्मचारी यांनीही स्थानिक पातळीवर दक्ष राहणे आवश्यक आहे. कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन होत नसल्याचे काही ठिकाणी दिसत आहे. अशावेळी संबंधित सर्वांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.


नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कडक कारवाई अपेक्षित आहे. सुपर स्प्रेडर रोखण्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणांनी तसेच महानगरपालिका क्षेत्रातही नेमलेल्या विविध पथकांनी त्यांच्यावर कारवाई करावी. सार्वजनिक समारंभ, लग्न सोहळे आदी ठिकाणी नियमांची पायमल्ली होणार नाही, याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.


सध्या रुग्ण वाढ वेगाने होत आहे. त्यामुळे तालुकास्तरीय यंत्रणांनी कोविड केअर सेंटर आणि डीसीएचसी अद्यावत कराव्यात. दुसऱ्या लाटेवेळी दैनंदिन सर्वाधीक रुग्णसंख्येसाठी लागलेल्या ऑक्सीजनच्या तिप्पट ऑक्सीजन साठवणूक करण्यासंदर्भात यापूर्वीच सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, संभाव्य रुग्णसंख्या लक्षात घेऊन बेड्सची उपलब्धता कऱण्यात यावी, अशा सूचना श्री. निचित यांनी दिल्या.  ***

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post