खर्डा किल्ल्यावर फडकणार देशातील सर्वात उंच भगवा 'स्वराज्य ध्वज', आमदार रोहित पवार यांची घोषणा


खर्डा किल्ल्यावर फडकणार देशातील सर्वात उंच भगवा 'स्वराज्य ध्वज'

आमदार रोहित पवार यांची घोषणा
नगर (सचिन कलमदाणे):  जामखेड जवळील ऐतिहासिक  खर्डा (भुईकोट) किल्ल्यावर देशातील सर्वात उंच भगवा ध्वज फडकविण्यात येणार आहे. या किल्ल्याच्या आवारात शौर्य आणि एकतेचं प्रतीक म्हणून 74 मीटरचा मोठा भगव्या रंगाचा स्वराज्य ध्वज लावला जाणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी याबाबतची घोषणा केली आहे. 

अहमदनगर जिल्ह्यात वसलेला खर्डा किंवा शिवपट्टन किल्ला महाराष्ट्राचा इतिहास सांगतो. खर्डा किल्ल्याच्या याच कातळांनी एकेकाळच्या निधड्या छातीच्या रांगड्या मावळ्यांचा पराक्रम पाहिला आहे. या किल्ल्यावर ध्वज फडकवण्याआधी तो देशातील मुख्य धार्मिक ठिकाणी आणि पंढरपूरला फिरवला जाईल. त्यानंतर 15 ऑक्टोबर 2021 रोजी स्वराज्य ध्वज खर्डा किल्ल्याच्या आवारात लावला जाईल. 

आमदार रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट || स्वराज्य ध्वज ||


स्वराज्य ध्वज - प्रतिक सामर्थ्याचं, ज्ञानाचं आणि बलिदानाचं.


स्वराज्य ध्वज - प्रतिक ऊर्जेचं, भक्ती-शक्तीचं आणि आनंदाचं.


स्वराज्य ध्वज - प्रतिक वैराग्याचं, संयमाचं आणि सळसळत्या उत्साहाचं.


स्वराज्य ध्वज - प्रतिक निष्ठेचं, परंपरेचं, जिज्ञासा आणि आशीर्वादाचं.


लहानपणापासून आपण सगळेच मंदिरं, गडकिल्ल्यांना भेट देतो. मंदिरं, गडकिल्ल्यांवर आपल्याला भगवं निशाण फडकताना दिसतं. तिथं फडकणाऱ्या भगवा झेंड्याकडे पाहिल्यावर मला नेहमीच प्रेरणा आणि शक्ती मिळते. आणि मला विश्वास आहे हा अनुभव तुम्हालाही आला असेल. आपल्याकडच्या अनेक महत्त्वाच्या सण समारंभातही भगव्याला विशेष महत्त्व आहे. 


संपूर्ण सृष्टीला ऊर्जा देणारा सूर्य उगवण्यापूर्वी आकाशात पसरतो तो भगवा रंग. नवी सुरुवात करण्यासाठी प्रेरणा देणारा हा भगवा रंग. आकाशात उंच भगवा ध्वज फडकताना पाहिला की भक्ती, शक्ती, त्याग, शौर्य, निष्ठा अशा भावना एकाचवेळी मनात उमटतात आणि नम्रतेने आपले हात आपोआप जोडले जातात. भगवा ध्वज हा आपल्या सर्वांचाच अभिमान, सर्वस्व आणि स्फूर्तिस्थान आहे. परमार्थ, त्याग शिकवणारा सर्वोच्च मानबिंदू आहे. भारतीय संस्कृतीचं शाश्वत सर्वमान्य प्रतिक आहे.


'भगवा' म्हणजे उत्तम गुणांनी संपन्न. भगवा हा शब्द रंगही दाखवतो. पाली वाङ्मयात अनेक ठिकाणी सर्वगुणसंपन्न गौतम बुध्दांना उद्देशून 'भगवा' शब्द आला आहे. बौद्धगुरूंच्या वस्त्रामध्ये भगव्या रंगाला विशेष स्थान आहे. भगवा रंग हा कोणा एकाचा नव्हे तर तो सर्वांचा असून समानतेचा, एकीचा संदेश देणारा आहे. रामायण-महाभारत यांसारख्या पौराणिक कथांमध्येही योध्यांच्या रथांवर ध्वज फडकत होते. समाजप्रबोधन करत भक्ती मार्गावर चालताना संतांनी, सहिष्णुतेची शिकवण देणाऱ्या वारकरी संप्रदायाने खांद्यावर जी पताका घेतली तीही भगव्याचीच छटा असलेल्या काव रंगातली. छत्रपती शिवरायांनी पहिल्यांदा सर केलेल्या तोरणा किल्ल्यावर भगवे निशाण फडकावून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली.


बलाढ्य शत्रूवर चाल करताना शिवराय आणि त्यांच्या अठरापगड जातीच्या मावळ्यांना हा भगवाच स्वराज्यासाठी प्राणपणाने लढण्याची प्रेरणा देत होता. फुले, शाहू, आंबेडकरांनी आपल्या कामातून जनतेच्या कल्याणाची, समाजप्रबोधनाची ही ज्योत पुढे तेवत ठेवली. कबीरदास, महात्मा गांधी, विनोबा भावे, कर्मवीर भाऊराव पाटील अशा अनेक समाजसुधारकांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवून क्रांतीची मशाल पेटवली. म्हणूनच, धार्मिक, आध्यात्मिक, सामरिक महत्त्व एकवटत असलेल्या या भगव्या ध्वजापुढं प्रत्येकजण कृतज्ञतेनं नतमस्तक होतो.


लाल आणि पिवळ्या रंगांच्या मिश्रणातून तयार झालेला हा भगवा रंग ऊर्जा, भक्ती, शक्ती आणि आनंदाचं प्रतिक मानला जातो. अग्नीच्या धडधडत्या ज्वालांमध्येही तो दिसतो. अग्नी वाईट गोष्टींचा विनाश करून शुद्धता देतो. भगव्या झेंड्याचा आकारही दुर्गुणांचा नाश करणाऱ्या अग्निज्वालांसारखाच आहे. भगवा रंग तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाचं, प्रगतीचं, त्यागाचं, संघर्षाचं, न्यायाचं, प्रगल्भतेचं आणि समतेचं प्रतीक आहे. जगभरात सगळीकडेच वेगवेगळ्या काळातील राजवटींमध्ये वैशिष्ट्यपूर्ण ध्वजांना मानाचं स्थान होतं. या ध्वजांना फ्लॅग, झेंडा, गुढी, दिंडी, पताका, अलम, कुर, निशाण, फरारा, स्टँडर्ड, गिडन किंवा कलर्स असंही म्हणलं जातं. नावं वेगवेगळी असली तरी त्यामागची ऊर्जा, प्रेरणा मात्र तीच असते.


हिंदवी स्वराज्याच्या विराट विजयाची नोंद झालेली शेवटची लढाई नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातील शिवपट्टण किल्लाभोवती झाली. तोच ज्याला खर्ड्याचा भुईकोट किल्ला म्हणूनही ओळखलं जातं. इथं प्राणपणाने लढणाऱ्या शूर मराठी सैनिकांनी विजयाचं स्वप्न पाहिलं आणि भगव्याच्या साक्षीने ते साकारही केलं. या किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व ओळखून आम्ही, कर्जत-जामखेडकरांनी या परिसराला नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प केला आहे. या किल्ल्याच्या आवारात भव्य 'स्वराज्य ध्वज' साकार होत आहे आणि तिथं हाच भगवा अभिमानानं फडकणार आहे. या ध्वजाचं वैशिष्ट्य म्हणजे हा महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील किंबहुना जगातील सर्वांत उंच भगवा ध्वज असेल. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या १६७४ मध्ये झालेल्या राज्याभिषेकाचे स्मरण म्हणून या ध्वजाची उंची ७४ मीटर ठेवण्यात आलीय.


संत गीतेबाबा, संत सितारामबाबा, सद्गुरू संतश्री गोदड महाराज अशा संत-महात्म्यांच्या वास्तव्यानं पावन झालेली ही भूमी आहे. अष्टविनायकांपैकी एक असलेले सिद्धटेक हे स्थळही याच भूमीत आहे. राज्यकारभार कसा करावा याचा आदर्श घालून देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थान असलेली ही पावनभूमी आहे. भारतातील बारा मल्हारांपैकी एक असलेलं शेगुडचं खंडोबा मंदिर, चौंडीचं महादेव मंदिर, जामखेडचं हेमाडपंथी नागेश्वर मंदिर, राशीनचं जगदंबा माता मंदिर, एकतेचं प्रतिक असलेला पीर बाबा दर्गा, धनेगाव इथली धाकटी पंढरी, देशातील एकमेव दुर्योधनाचे मंदिर अशी कितीतरी वैशिष्ट्यपूर्ण श्रद्धास्थानं या भागात आहेत. इथला भूगोल जसा वैशिष्ट्यपूर्ण आहे तसा इतिहासही समृध्द आहे. भगवा ध्वज आपल्या समृद्ध सांस्कृतिक, ऐतिहासिक वारशाचा साक्षीदार आहे. असा हा भव्य भगवा ध्वजस्तंभ सर्वप्रथम कर्जत जामखेडमध्ये उभारला जातोय, याचा मला सार्थ अभिमान आहे. कर्जत-जामखेडचा लोकप्रतिनिधी म्हणून मला विश्वास वाटतो की हा विक्रमी उंचीचा स्वराज्य ध्वज आमच्या कर्जत-जामखेडची नवी ओळख बनेल.


हा 'स्वराज्य ध्वज' माझा, तुमचा किंवा कोणा एकट्याचा नाही तर हा सगळ्यांचा आहे. हा एक विचार आहे. युवा पिढी ही राज्याचं, देशाचं भवितव्य आहे. देशाला पुढे नेण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांवर आहे. युवाशक्तीला योग्य दिशेने नेताना सकारात्मक विचाराची आणि प्रेरणेची गरज असते आणि असा विचार आणि प्रेरणा हा स्वराज्य ध्वज देईल, अशी मला खात्री वाटते.


तब्बल १८ टन वजन असलेल्या खांबावर ९० किलो वजनाचा आणि ९६x६४ फूट अशा भव्य-दिव्य आकाराचा हा स्वराज्य ध्वज आकाशाला गवसणी घालणाऱ्या ७४ मीटर उंचीवर डौलाने फडकणार आहे. 


काल बारामतीत राज्यस्तरीय 'सृजन भजन महास्पर्धेच्या पारितोषिके समारंभाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील संतपीठांच्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रथम या ध्वजाचं पूजन करण्यात आलं. या गौरवशाली स्वराज्य ध्वजाचा प्रवास आता पुढील दोन महिने लोकसहभागातून महाराष्ट्रासह देशभरातील प्रमुख ७४ अध्यात्मिक, धार्मिक स्थळी, संतपीठं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले किल्ले या शक्तीपीठांच्या ठिकाणी तसंच श्रीराम मंदिर (अयोध्या), मथुरा, बोधगया (बिहार), केदारनाथ (उत्तराखंड), शाहू-फुले-आंबेडकरांच्या स्मारकाच्या ठिकाणी, वर्ध्यात महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम आदी ठिकाणी नेऊन तिथं पूजन केली जाईल. शेवटी पंढरपूरच्या विठुरायाच्या अंगणात या ध्वजाची पूजा केल्यानंतर खर्ड्याच्या भुईकोट किल्ल्यासमोर या स्वराज्य ध्वजाची मान्यवरांच्या उपस्थितीत १५ ऑक्टोबर रोजी प्रतिष्ठापना केली जाणार आहे.


हा ध्वज जगभरातील पर्यटकांचं आकर्षण ठरणारच पण सामर्थ्य, धैर्य, शक्ती, भक्ती, प्रगती, प्रेरणा याचं प्रतीक ठरेल आणि डौलाने फडकत राहील, असा विश्वास आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post