2 हजारांहून अधिक 'रेशीमगाठींचा' योग जुळवून आणणारी ‘महावीर बायोडाटा बँक’

 स्वर्गात निश्चित झालेल्या 2 हजारांहून अधिक रेशीमगाठींचा योग जुळवून आणणारी ‘महावीर बायोडाटा बँक’

‘सोच बदलिये..रिश्ते बनाईये’ हा मंत्र समाजात रूजवणारे अनिल मेहेर यांचे अनोखे कार्यनगर(सचिन कलमदाणे) : सध्याच्या काळात विवाह जुळविणे ही पालकांसाठी मोठी समस्या बनली आहे. करोनामुळे तर घराबाहेर पडतानाही चार वेळा विचार करावा लागतो. याशिवाय आता नंतरच्या कटकटींमुळे मध्यस्थ ही संकल्पनाही हद्दपार होत चालली आहे. अशा वातावरणात गेल्या 8 वर्षात 2 हजारांहून अधिक रेशीमगाठी जुळविण्याचे काम नगरमधील अनिल मेहेर यांनी आपल्या महावीर बायोडाटा बँकेमार्फत केले आहे. ‘सोच बदलिये..रिश्ते बनाईये’ हा मंत्र देत आधुनिक डिजीटल तंत्रज्ञानाचा अतिशय चपखल वापर करीत मेहेर व त्यांचे सहकारी राज्यभरातील विवाह इच्छुकांना एका व्यासपीठावर आणून त्यांच्या सुखीसंसाराची पायाभरणी करीत आहेत. अनेक घटस्फोटीतांचेही नव्याने विवाह जुळवत या बँकेने त्यांचे संसार उभे केले आहेत. 
लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हटले जाते. मात्र हा योग जुळुन येण्यासाठी प्रयत्न जमिनीवरच करावे लागतात. त्यातही आताचा काळ प्रचंड धावपळीचा आहे. एकमेकांकडे जाणे येणे कमी झाले आहे. त्यामुळे घरातील उपवर मुलामुलींचे विवाह जुळवताना स्थळ शोधण्यापासून पालकांना कसरत करावी लागते. समाजातील या वास्तवाची जाणीव झाल्याने अनिल मेहेर यांनी उत्स्फूर्तपणे हे काम हाती घेतले. 13 वर्षांपूर्वी ते नगरमध्येच महावीर भवन येथे दररोज ठराविक वेळी थांबून मुलामुलींचे बायोडाटा जमा करायचे. पुढे 2016 पासून व्हॉटसअप सारख्या माध्यमाचा उपयोग करून महावीर बायोडाटा बँकेचे ग्रुप तयार केले. 2017 पासून हे ग्रुप जोराने धावायला लागले. आज जवळपास अडीच हजारांहून अधिक लोक त्यांच्या ग्रुप्समध्ये आहेत. यात विवाह इच्छुकांचे फोटो, बायोडाटा टाकला जातो. अनुरुप अशा जोडीदाराचा शोध घेतला जातो. विवाह जुळल्यानंतर संबंधित लोक ग्रुपमधून बाहेर जातात व तितकेच लोक नव्याने ग्रुपमध्ये दाखल होतात.
या सर्व ग्रुपमध्ये समन्वय ठेवण्याचे काम मेहेर सातत्याने करतात. पूर्वी एकमेकांच्या घरी जावून पाहण्याचा, कुंडली जुळविण्याचा कार्यक्रम व्हायचा. यातही मेहेर यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरले आहे. आता झुम मिटिंगव्दारे मुले मुली एकमेकांशी थेट संवाद साधतात. तसेच बायोडाटाबरोबर स्वत:ची दोन चार मिनिटांची व्हिडिओ क्लिपही पाठवतात. त्यामुळे दोन्ही बाजूंचा खूप वेळ वाचतो. नव्याने नातेसंबंध तयार होताना मनात बर्‍याच शंका असतात. यासाठी स्वत: मेहेर मध्यस्थी करून दोन्ही कुटुंबांना एकत्र आणतात. मुलामुलींना समोरासमोर बसवून त्यांचे समुपदेशन करतात. एकदा रेशीमगाठ जुळल्यावर त्या कुटुंबांच्या चेहर्‍यावर झळकणारा आनंदच माझ्यासाठी अनमोल असल्याचे मेहेर आवर्जून सांगतात. 
ही उपक्रम राबवताना मेहेर यांनी अनेक घटस्फोटीतांनाही नव्याने वैवाहिक जीवनाचा आनंद मिळवून दिला आहे. दोन वेळा घटस्फोट झालेल्या व दोन मुले पदरी असलेल्या महिलेचा विवाह त्यांच्या माध्यमातून प्रथमच लग्न करणार्‍या सुखवस्तू कुटुंबातील मुलाशी जुळवून दिला. आज ती महिला आनंदाने संसारात रमली आहे. याशिवाय एका घटस्फोटीत व सी.ए.असलेल्या मुलीचा विवाहही त्यांनी प्रथम वराशी जुळवून दिला. अशी अनेक उदाहरणे केवळ मेहेर यांच्या प्रयत्नांमुळे घडली आहेत. परमेश्वरच या सर्व कार्यासाठी शक्ती देतो अशी विनम्र कृतज्ञता मेहेर व्यक्त करतात. अनिल मेहेर संपर्क : 90281 77732

लॉकडाऊनमध्ये जुळवले 600 विवाह..

गेल्या पंधरा महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे लोकांना घराबाहेरही पडता येत नाही. करोना महामारी कधी निरोप घेईल हे आज तरी कोणीच सांगू शकत नाही. अशावेळी विवाह थांबवणेही शक्य नाही. त्यामुळेच या काळात व्हॉटसअपसारख्या सोशल माध्यमाचा अतिशय सुंदर उपयोग झाला. तब्बल 600 विवाह या काळात जुळविण्यात आले. सर्व नियम पाळून संबंधितांनी आटोपशीर पद्धतीने लग्नही उरकले.  

सातत्यपूर्ण काम...
अनिल मेहेर जवळपास 13 वर्षांपासून कुठल्याही अपेक्षेविना केवळ आत्मानंद मिळण्यासाठी बायोडाटा बँक चालवित आहे. स्वत:चा मोठा व्याप असलेला व्यवसाय सांभाळून ते केवळ सामाजिक बांधिलकीतून हे काम करतात. यासाठी त्यांना पत्नी अर्चना मेहेर तसेच मुलं अंकुश, अमृता, अंकिता यांचेही सहकार्य लाभते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची कल्पना मुलांमुळेच शक्य झाल्याचे ते सांगतात. याशिवाय प्रवीण बोरा, सतीश (दादा) कर्जतकर, संजय गांधी, ऍड.नरेश गुगळे हे सुध्दा या उपक्रमात त्यांना मोलाची साथ देतात.  

पालकांनीच स्वत:ला आवर घालावा...
दोन हजारांहून अधिक विवाह जुळविण्यात महत्त्वाची भूमिक बजावणारे अनिल मेहेर विवाह संस्था व समाजाच्या मानसिकेतेवरही मार्मिक बोट ठेवतात. आताच्या काळात मुलामुलींपेक्षा पालकच अधिक अपेक्षा ठेवतात. मुलांवर निर्णय लादण्याचा प्रयत्न करतात. यामुळे मुलामुलींची एकमेकांना पसंती असतानाही विवाह जुळत नाही. पालकांनीही आपली पारंपरिक मानसिकता बदलायला हवी. मुलामुलींना निर्णय घेवू द्यावेत, त्यांच्याशी सतत संवाद साधावा. योग्य अयोग्य याबाबत फक्त मार्गदर्शन करावे. अवास्तव अपेक्षा ठेवणे बंद करावे. शेवटी संसार हा नवरा बायको दोघांचा असतो. त्यात अवाजवी हस्तक्षेप टाळलाच पाहिजे, असे अनुभवी मत मेहेर व्यक्त करतात.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post