ई-पीक पाहणी मोबाईल ॲप, पीकाची माहिती स्वत:च भरणे शक्य

 

ई-पीक पाहणी मोबाईल ॲप, पीकाची माहिती  स्वत:च भरणे शक्य 



मुंबई, दि.13:  येत्या काळात ई-पीक पाहणी मोबाईल ॲप शेतकऱ्यांना आपलेसे करुन घेईल याबद्दल विश्वास वाटतो, राज्यभरात राबविला जाणारा हा ई-पीक पाहणी प्रकल्प देशासाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

 

येत्या स्वातंत्र्य दिनापासून महसूल आणि कृषी विभागाच्या वतीने ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबविण्यात येणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह येथे ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाचे ऑनलाईन लोकार्पण इलेक्ट्रॉनिक कळ दाबून करण्यात आले. यावेळी  महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादाजी भुसे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, ऑनलाईन पद्धतीने कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, मुख्य सचिव सीतराम कुंटे,  महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, जमाबंदी आयुक्त व संचालक निरंजन सुधांशू, टाटा ट्रस्टचे मुख्य सल्लागार जयंतकुमार बांठिया, टाटा ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनाथ नरसिंहन, ई फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप, यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

मोबाईल ॲपचे ऑनलाईन लोकार्पण केल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, काही वर्षांपूर्वी शेतकऱ्याला स्वत:चा सातबारा पाहायला मिळण्यासाठी खूप कष्ट करावे लागत असे. पण आज शेतकऱ्यांना आपला सातबारा मोबाईलमध्ये पाहणे शक्य झाले आहे. काळाप्रमाणे बदलणे हा प्रकृतीचा नियम आहे असे आपण म्हणतो मग बदलत असताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण नवनवीन प्रयोग करुन शेतकऱ्यांचे कष्ट कमी करण्याबरोबरच त्यांना सोप्या आणि सुलभ पध्दतीने आवश्यक असणारी कागदपत्रे मिळवून देणे, पिकांची माहिती मिळवून देणे यावर भर देत आहोत याचा आनंद वाटतो. 

महसूलमंत्री श्री. थोरात म्हणाले, महाराष्ट्रात राबविण्यात येणारा हा पथदर्शी प्रकल्प असून आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे. ई पीक पाहणी प्रकल्प हा प्रत्येक कुटुंबाशी जोडला जाणारा प्रकल्प आहे. आज आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे स्वरुप जरी मर्यादित स्वरुपातले तरी याचा होणारा परिणाम हा व्यापक स्वरुपातील आहे.टाटा ट्रस्टमार्फत सुरुवातीला हा प्रकल्प अवघ्या दोन जिल्हयात पथदर्शी प्रकल्प म्हणून सुरु करण्यात आला होता मात्र आता हा प्रकल्प राज्यभरात राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे शेतकरी बांधवांना आपल्या पीकाची माहिती स्वत:च भरणे शक्य होणार आहे. आताच्या डिजिटल युगात शेतकऱ्यांना सहज, पारदर्शक व बिनचूक सुविधा उपलब्ध करण्यासाठी महसूल विभाग कटिबद्ध असून यापुढील काळातही हा विभाग लोकाभिमुख करताना सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबविण्यात पुढे राहील. आज लोकार्पण करण्यात आलेल्या प्रकल्पाची राज्यस्तरावर अंमलबजावणी होणार आहे. तसेच पुढील 15 दिवसात राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नोंद ॲपवर कशी करायची याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post