नामनिर्देशित नगरसेवकही स्थायी समिती सदस्य बनू शकतो...न्यायालयाचा मोठा निकाल

नामनिर्देशित नगरसेवकही स्थायी समिती सदस्य बनू शकतो...न्यायालयाचा मोठा निकाल मुंबई : नामनिर्देशित नगरसेवक स्थायी समितीचा सदस्य बनू शकत नाही, असा निर्णय देत भाजपचे भालचंद्र शिरसाट यांना समिती सदस्यपदावरून हटवण्यात आले होते. हे प्रकरण उच्च न्यायालयानंतर सर्वोच्च न्यायालयात गेले. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने शिरसाट यांचे सदस्यत्व कायम ठेवण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे आता नामनिर्देशित नगरसेवकही स्थायी समितीचा सदस्य बनू शकतो. स्थायी समितीच्या सदस्यपदी नगरसेवक असावा, अशी महापालिकेच्या कायद्यात तरतूद आहे. मात्र तो नगरसेवक निवडून आलेला असावा की नामनिर्देशित असा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे नामनिर्देशित नगरसेवक असलेले भाजपचे भालचंद्र शिरसाट यांची पक्षातर्फे स्थायी समिती सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. त्यास पालिका सभागृहानेही मंजुरी दिली. मात्र स्थायी समितीने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला.

याविरोधात शिरसाट यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर न्यायालयाने स्थायी समितीचा निर्णय रद्द ठरवला. याविरोधात महापौर व महापालिका प्रशासन यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या प्रकरणी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने महापौर व प्रशासनाची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे शिरसाट यांचे स्थायी समिती सदस्यत्व कायम राहणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post