विधानसभेला नगर शहरातून भाजप लढणार की नाही? खा.विखेंच्या ‘समझोता एक्सप्रेस’मुळे निष्ठावंत अस्वस्थ

 खा.विखेंच्या ‘समझोता एक्सप्रेस’मुळे भाजपमधील निष्ठावंत अस्वस्थ, विधानसभेला नगर शहरातून भाजप लढणार की नाही?नगर : लोकसभा निवडणुक एकमेकांविरोधात लढणारे भाजपचे खा.डॉ.सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आ.संग्राम जगताप यांच्यात विधानसभा निवडणुकीनंतर चांगलेच सख्य निर्माण झाले आहे. नगर शहरातील उड्डाणपूलासह विविध विकासकामांकरिता खासदार व आमदारांची सहमती एक्सप्रेस धावत आहे. नगरकरांसाठी ही समाधानाची बाब असली तरी मागील काही काळात खा.डॉ.विखे सातत्याने आ.जगताप यांची जाहीर स्तुती करीत आहेत. विकासासाठी आम्ही राजकीय जोडे बाजूला ठेवत असल्याचे खा.विखे सातत्याने सांगत आहेत. 

शहराचा रखडलेला विकास पाहता दोघांनी एकत्र येणे चांगलीच बाब आहे. परंतु, त्याचवेळी खा.विखे यांच्याकडून सातत्याने आ.जगताप यांच्यावर स्तुतिसुमने उधळली जात असतील तर येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपने नेमकी कोणती भूमिका घ्यावी असा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडला आहे. विकासासाठी एकत्र काम करणे ठिक आहे. परंतु, राजकारण म्हणून शहरात भाजपला अस्तित्त्व कायम ठेवायचे आहे. नगर शहरात भाजपची ताकद असताना युतीमुळे 25 वर्षे भाजपला शहरात शिवसेनेला साथ द्यावी लागली. युती तुटल्यानंतर 2014 ला विधानसभा निवडणुकीत शहरातून भाजपने उमेदवार दिला. त्यावेळी भाजपला यश मिळाले नसले तरी शिवसेनेला त्याची किंमत मोजावी लागली होती. 2019 ला पुन्हा शिवसेनेबरोबर युती झाल्याने भाजपला थांबावे लागले. आता 2024 ला भाजपला पुन्हा विधानसभेला स्वत:ची ताकद अजमावता येणार आहे. यासाठी भाजपमधील काही इच्छुक प्रयत्नही करीत आहेत. मात्र पक्षाचे खासदारच विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधीशी जुळवून घेत असेल तर पक्षाची ताकद कशी वाढणार आणि विधानसभेला आत्मविश्वासाने लढता येईल का असा प्रश्न निष्ठावंतांना पडला आहे. खासदारांची समझोता एक्सप्रेस अशीच धावत राहिली तर विधानसभा निवडणुकीत भाजपला शहरात काय स्थान राहिल अशीही चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होत आहे.


समझोता एक्सप्रेसव्दारे खा.विखे स्वत:च्या लोकसभा निवडणुकीसाठी रस्ता मोकळा करीत आहेत. परंतु स्थानिक पातळीवरील विधानसभा निवडणुकीसाठी त्यांची ही भूमिका पक्षासाठी मोठा अडसर ठरते की काय अशीही चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post