नगरमध्ये नूतन जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीचे काम अंतिम टप्प्यात

 नूतन जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीचे काम गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करा: महसूलमंत्री बाळासाहेब थोरात अहमदनगर: जिल्हाधिकारी कार्यालयाची नूतन इमारतीचे काम हे गुणवत्तापूर्ण होईल याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे आणि वेळेत काम पूर्ण होईल, यासाठी पाठपुरावा करावा, अशा सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्या.


श्री. थोरात यांनी आज येथील नुतन जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या कामांची पाहणी केली.  यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदरा लहू कानडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जे.डी. कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, कार्यकारी अभियंता संजय पवार यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच उपअभियंता व इतर अधिकारी उपस्थित होते.


यावेळी महसूलमंत्री श्री. थोरात म्हणाले, नूतन इमारत आता पूर्णत्वाकडे आली आहे. इमारतीची राहिलेली कामे अधिक गतीने आणि दर्जेदारच झाली पाहिजेत. त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये, गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करु नये. जिल्हाधिकारी कार्यालय इमारत ही जिल्ह्याच्या दृष्टीने प्रशासकीय दृष्ट्या अधिक महत्वाची आहे. तेथील कामाची गुणवत्ता ही सर्वेोच्च हवी, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. जिल्हाधिकारी इमारत बांधकामासाठी पुरेसा निधी आता उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामुळे अधिक वेगाने काम करुन इमारत पूर्णत्वाला न्या, असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले आणि अधीक्षक अभियंता श्री. कुलकर्णी यांनी त्यांना इमारत बांधकामाच्या सद्यस्थितीची माहिती दिली.  


यावेळी महसूलमंत्री श्री. थोरात यांच्यासह आमदार डॉ. तांबे, आमदार श्री. कानडे, जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. **

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post