खावटी अनुदान योजनेचा लाभ घ्यावा - जि.प. अध्यक्षा राजश्री घुले

खावटी अनुदान योजनेचा लाभ घ्यावा -  जि.प. अध्यक्षा राजश्री घुले 



 शेवगाव (संदीप देहाडराय):  - राज्यात उदभवलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर महाविकास आघाडी सरकारने अनुसुचित जमातीच्या कुटूंबियांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजना एक वर्षापासून सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून अनुसुचित जमातीच्या कुटूबियांची उपासमार होऊ नये म्हणून प्रयत्न सुरु आहेत. लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे प्रतिपादन जिल्हा परीषद अध्यक्षा राजश्री घुले यांनी केले.

    आदिवासी विकास विभागांतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थींसाठी खावटी अनुदान योजनेतून शेवगाव तालुक्यातील ४८८ लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या अन्नधान्य व किराणा साहीत्य व रोख रक्कमेचे वाटप आज शुक्रवार ता.१६ रोजी पंचायत समितीमध्ये जिल्हा परीषद अध्यक्षा राजश्री घुले व पंचायत समितीचे सभापती डाँ. क्षितीज घुले यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. यावेळी घुले बोलत होत्या. यावेळी तहसिलदार अर्चना भाकड- पागिरे, प्रभारी गटविकास अधिकारी शेखर शेलार, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनिल बोरसे, सुरेश दुसंगे, शिवाजी नेमाणे, सरपंच उज्ज्वला मेरड, सरपंच प्रदिप काळे, सरपंच संतोष धस, समीर शेख, शफीक शेख, शिवाजी नरके, अरुण सोनवणे, लक्ष्मण कुसळकर, गोवर्धन वाघ आदी उपस्थित होते.  
    यावेळी राजश्री घुले म्हणाल्या की, स्व.मारुतराव घुले पाटलांनी घालून दिलेल्या संस्काराप्रमाणे घुले कुटूंबिय जातीपातीचे राजकारण न करता सर्व घटकांना बरोबर घेवून काम करीत आहे. कोरोनाची तिसरी लाट येत असून लसीकरणापासून वंचीत असलेल्या गोरगरीब कुटूंबियांमधील व्यक्तींसाठी तालुक्यात लस उपलब्ध करुन देण्याचे आपले प्रयत्न आहेत. अनुसुचित जमातीच्या नागरीकांनी लस घेण्यासाठी पुढे यावे.
    क्षितीज घुले म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून ही योजना सुरु केली आहे. या योजना तळागाळागतील नागरींकाना पोहचविण्याचे काम आम्ही करीत आहोत. तालुका सर्व जाती धर्मांतील नागरीकांना बरोबर घेवून गुण्या गोविंदाने नांदत होता. मात्र अलीकडच्या काळात जातीपातीचे राजकारण करुन तालुक्यात विष पेरण्याचे काम सुरु आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येवून उभा राहण्याची गरज आहे.
    खावटी अनुदान योजनेतून तालुक्यातील पारधी ८३, भूमीहीन २७६, मनरेगा ३५, विधवा ८२, घटस्पोटीत ७, अपंग ४ व वनहक्क १ अशा ४८८ लाभार्थ्यांना अन्नधान्य व किराणा साहीत्य व रोख दोन हजार रुपयांचे वाटप आज करण्यात आले. यावेळी कोळगे, दुसंगे, मेरड यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्तविक सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनिल बोरसे यांनी तर सुत्रसंचालन आरोग्य विस्तार अधिकारी डाँ. सुरेश पाटेकर यांनी केले. तर सहाय्यक समन्वयक सुधीर सांगळे यांनी आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post