नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे प्रशासनाचे आवाहन

 नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे प्रशासनाचे आवाहन



अहमदनगर: लगतच्या जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पाऊस सुरु असल्याने त्या धरणसाठ्यातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. तरी नदीकाठच्या नागरिकांनी तसेच सखल भागात राहण्यार्‍या नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन  निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप निचित यांनी केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथील दुरध्वनी क्रमांक 1077 (टोल फ्री), 0241-2323844  वा 2356940 वर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.


 


दिनांक 23 जुलै, 2021 रोजी सकाळी 10 वाजता अहमदनगर जिल्हयातुन वाहणा-या गोदावरी नदी नांदूरमधमेश्वर बंधा-यातून 807 क्युसेस व भिमा नदीस दौंड पुल येथे 52.048 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन नदीपात्रातील विसर्गात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी स्थानिक प्रशासनाव्दारे दिलेल्या सुचनांचे पालन करावे. सखल भागात राहणा-या नागरिकांना तातडीने सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. तसेच पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्र तसेच ओढे व नाले यापासुन दुर रहावे व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करु नये. जुनाट/मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळे भूस्सखलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणार्‍या लोकांनी दक्षता घ्यावी. वेळीच सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरु नये. अचानक नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यास जिवीतास धोका उदभवू शकतो. धोकादायक ठिकाणी चढू अथवा उतरु नये. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्षीत ठिकाणी आश्रय घ्यावा.  असे आवाहन करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post