युवकांसाठी सुवर्णसंधी....उद्योग व्यवसाय सक्षमीकरणासाठी व्यंकटेश फाउंडेशनच्या 'उद्योग क्रांती' चळवळीची मुहूर्तमेढ

 उद्योग क्रांती चळवळ सकारात्मक परिवर्तन घडवणारी ठरेल : पदमश्री पोपटराव पवार


  उद्योग व्यवसाय सक्षमीकरणासाठी व्यंकटेश फाउंडेशनच्या 'उद्योग क्रांती' चळवळीची मुहूर्तमेढ
नगर: पारंपरिक व्यवसाय करत असताना आजच्या युगात नवीन व्यवसाय, उद्योगाकडे वळणे अनिवार्य बनले आहे. विशेषतः शहरांमधील वाढती गर्दी लक्षात घेऊन ग्रामीण भागातील तरूणांनी स्थानिक पातळीवरच नवनवीन उद्योग सुरू केले तर रोजगार निर्मिती बरोबरच ग्रामीण अर्थकारणालाही चालना मिळेल. काही तरी चांगला उद्योग करण्याची जिद्द असलेल्यांसाठी व्यंकटेश फाऊंडेशनने उद्योग क्रांतीच्या माध्यमातून दिशा देण्याचं काम सुरू केले आहे. या उद्योग क्रांती चळवळीला सामाजिकतेची जोड दिल्यास खरोखर सकारात्मक परिवर्तन घडलेले दिसेल असा विश्वास आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केला.

युवा शक्तीला नवी दिशा व नवी शक्ती मिळावी व यातून देशाचा विकास व्हावा या उदात्त उद्देशाने व्यंकटेश फाऊंडेशनने 'उद्योग क्रांती' ही चळवळ सुरू केली आहे. या उद्योग क्रांती चळवळीचा मार्गदर्शन कार्यक्रम नगरमध्ये झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. याप्रसंगी उद्योजक नरेंद्र फिरोदिया, सुवर्णम प्राईड उद्योग समूहाचे एन.बी.धुमाळ, व्यंकटेश फाउंडेशन चे  अध्यक्ष अभिनाथ शिंदे, संचालक कृष्णा मसुरे, अनिल गुंजाळ, व्यंकट देशमुख, व्यंकटेश फाऊंडेशनचे एम.डी. ज्ञानेश झांबरे, चित्र शिल्पकार प्रमोद कांबळे, ब्रॅण्ड कन्सल्टंट ज्ञानेश शिंदे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात अभिनाथ शिंदे यांनी सांगितले की, व्यावसायिक व उद्योजकांना सक्षम, समृद्ध करण्यासाठी उद्योग क्रांती चळवळ सुरू केली आहे. यातून नवीन उद्योजक निर्माण होऊन देशाचं अर्थकारण मजबूत होईल असा प्रयत्न आहे. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ही चळवळ योगदान देईल. या नव उद्योजकांना उद्योग क्षेत्रातील मेंटॉर मिळवून देतानाच उद्योग नोंदणी, अर्थसहाय्य मार्गदर्शन, बिझ नेशन ही उद्योगाशी निगडित पुस्तकांची लायब्ररी तसेच ऑनलाईन प्लॅटफॉर्म, डिजिटल मार्केटिंगचे तंत्र व मंत्र याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. यशस्वी उद्योजकव नवोदित उद्योजक यांना एका व्यासपीठावर आणून अनुभवाचे बोल मिळतील असा उद्योग क्रांतीचा प्रयत्न असणार आहे.

नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, आजच्या काळात प्रगती साधायची तर उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. उद्योग सुरू करताना प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. डिजिटल युगात लोकल टू ग्लोबल ही मानसिकता ठेवली पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रिस्क घ्यायची तयारी व धाडस दाखवले पाहिजे. तरच तुम्ही ध्येय गाठू शकता. व्यंकटेश फाउंडेशनच्या या चळवळीत मेंटॉर म्हणून आपण स्वतः नक्की योगदान देऊ. नवनवीन उपक्रमांसाठी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी 'उद्योजक होताना' या विषयावर व्याख्यान देताना एन.बी.धुमाळ म्हणाले की, उद्योग व्यवसाय सुरू करताना आपण हे कशासाठी करतोय, यातून आपल्याला काय मिळवायचे आहे असा प्रश्न स्वतःला विचारून उत्तर शोधा. एकदा तुम्ही स्वतः आतून सज्ज झालात की झोकून देऊन काम करा. यशस्वी होण्यासाठी दृष्टिकोन सर्वात महत्त्वाचा असतो. तुम्ही समोर आलेली संधी, समस्या याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले तर तुमची कृती सकारात्मक होते. यातून यश मिळते. धुमाळ यांनी आपल्या यशस्वी उद्योजकतेचा प्रवास मांडत उद्योग क्रांती चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवून नवोदितांना मार्गदर्शन करण्याची ग्वाही दिली.

या कार्यक्रमात व्यंकटेश फाउंडेशनच्या माध्यमातून स्थापन झालेल्या 'गुड गिफ्ट 24 "या नव्या व्यवसायाच्या वेबसाईटचेही अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले. आभार ज्ञानेश शिंदे यांनी मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उद्योग क्रांती चळवळीच्या अधिक माहितीसाठी व लाभ घेण्यासाठी संपर्क: 9804041111

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post