महामार्गावर गाड्या अडवून लुटणारी टोळी जेरबंद, २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

महामार्गावर गाड्या अडवून लुटणारी टोळी जेरबंद, २५ लाखांचा मुद्देमाल जप्तनगर: महामार्गावर गाड्या अडवून दरोडा टाकणारे पाच आरोपी गजाआड करण्यात श्रीगोंदा पोलिसांना यश आले आहे. आर्यन शंकर कांबळे (वय 24, रा. सांगवी, ता. फलटण), संजय बबन कोळपे (वय 46, रा. बोरी, ता. श्रीगोंदा), गणेश श्रीमंत गिरी (वय 25), भाऊसाहेब गंगाराम पालवे (वय 21, दोघेही रा. श्रीगोंदा कारखाना, श्रीगोंदा) आणि इतर एक यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. आरोपींकडून 25 लाख 66 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. 11 जुलै रोजी नीलेश चतरसिंग लोदी (वय 19, रा. बधोरिया, मध्यप्रदेश) यांनी फिर्याद दिली होती. त्यात म्हटले होते, की 6 जुलै रोजी उत्तरप्रदेश येथून 30 टन मक्याचे पोते भरलेले ट्रक घेऊन सांगली येथे जात असताना लोदी यांची ट्रक दरोडेखोरांनी अडवून ट्रक बाबुर्डी शिवारात नेली होती.            

तेथे आरोपींनी 14 टायर ट्रकमध्ये 25 टन मका भरून नेली होती. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात भादंवि कलम 392, 395 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना मिळालेल्या माहितीनुसार, मका चोरण्यासाठी आरोपींनी 12 टायर ट्रकचा वापर केल्याचे समजले. त्यावरून गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी यांना सूचना देऊन रवाना करण्यात आले होते. त्यांना मिळालेल्या माहितीतील ट्रक काष्टी याठिकाणी आढळून आला. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हा गुन्हा आरोपी कांबळे, कोळपे, गिरी, पालवे आणि त्यांच्या साथीदाराने केला असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला ट्रक, 25 टन मका, मोटारसायकल आणि लोदी यांचा मोबाईल असा 25 लाख 66 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक अमित माळी व पोकॉ. वैभव गांगर्डे करत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post