भीषण अपघात....स्विफ्ट कारच्या धडकेत आजोबासह नातवाचा मृत्यू

 स्विफ्ट कारच्या धडकेत आजोबासह नातवाचा मृत्यू

भातकुडगाव जवळील दत्तपाटी येथे अपघात नगर:   शेवगावहून भातकडुगाव फाट्याकडे जाणार्‍या दुचाकीला समोरुन येणार्‍या स्विफ्ट कारने जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात एका सहा वर्षाच्या मुलासह आजोबाचा मृत्यू झाला. तर आजी गंभीर जखमी झाली. हा अपघात शुक्रवार दि. 23 रोजी सायंकाळी 3.43 वाजेच्या दरम्यान शेवगाव- नेवासा मार्गावरील दत्तपाटी येथे घडला.

अपघातात मयत झालेल्या आजोबाचे नाव दुर्योधन भालचंद्र आरगडे (वय 53, रा. सौंदाळा, ता. नेवासा) असे असून नातवाचे नाव प्रथमेश प्रमोद आरगडे (वय 6, रा. सौदाळा) असे आहे. तर या अपघातात जखमी झालेल्या आजीचे नाव मिनाबाई दुर्योधन आरगडे (वय 48) असे आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथील दुर्योधन भालचंद्र आरगडे (वय 53) हे शुक्रवार दि. 23 रोजी आपला नातू व पत्नीसह वरुर येथे आपल्या मुलीला भेटण्यासाठी आले होते. मुलीला भेटून ते दुपारी 4 वाजेच्या दरम्यान शेवगाव - नेवासा रोडने आपल्या सौंदाळा गावी दुचाकीवरून चालले होते. दरम्यान सायंकाळी 4.43 वाजेच्या दरम्यान ते भातकुडगाव लगत असलेल्या दत्तपाटी येथून चालले असतांना समोरुन येणार्‍या स्विफ्ट कारने समोरून धडक दिली.

अपघात घडल्यानंतर तेथे उपस्थि असणार्‍या जोहरापूर येथील अशोक देवढे, भातकुडगाव येथील संतोष मेरड व इतरांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले. जखमींना तातडीने शेवगाव येथील नित्यसेवा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र तत्पुर्वी प्रथमेश प्रमोद आरगडे (वय 6 वर्षे) याचा मृत्यू झाला.

तर पुढील उपचारासाठी दुर्योधन आरगडे व पत्नी मिनाबाई आरगडे यांना नगर येथे घेऊन जातांना वाटेत दुर्योधन आरगडे (वय 53) यांचा मृत्यू झाला. तर जखमी मिनाबाई आरगडे यांच्यावर विळद घाटातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी सायंकाळी घटनास्थळी भेट देऊन स्विफ्ट कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे. तर दोन्ही मयतावर सौंदाळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post