प्रवासी म्हणून बसला आणि रिक्षाच केली लंपास...

प्रवासी म्हणून बसला आणि रिक्षाच केली लंपास.... नाशिक: रिक्षात बसलेल्या प्रवाशाने रिक्षाचालकाची नजर चुकवून त्याची रिक्षा व मोबाईलच चोरुन नेल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात प्रवाशा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश गोटू भारती (रा. सावता नगर नवीन नाशिक) हा रिक्षाचालक बस स्थानकावर प्रवाशांची वाट बघत उभा होता.


यादरम्यान एक प्रवासी आला व रिक्षा चालक भारती यांना म्हणाला की मला जेलरोड येथील सैलानी बाबा चौकात जाऊन पुन्हा परत यायचे आहे, किती पैसे पडतील असे विचारले त्याप्रमाणे रिक्षाचालक म्हणाले की मीटर प्रमाणे जेवढे पैसे होईल तेवढे द्या असे सांगितल्यावर संबंधित प्रवासी रिक्षात बसला, त्यानंतर रिक्षाचालक भारती हे काठे गल्ली टाकळी मार्गे नारायण बापु चौकाकडून सैलानी बाबा चौकाकडे जात असताना अलीकडे संबंधित प्रवाशाने रस्त्यावर असलेल्या दाताच्या दवाखान्याजवळ रिक्षा थांबविण्यास सांगितले.


त्याप्रमाणे भारती यांनी रिक्षा थांबविली असता सदर प्रवासी म्हणाला की माझ्या मित्राला मला फोन करायचा असून तुमचा फोन मला द्या.त्यानंतर रिक्षाचालकाने सदर प्रवाशाला फोन दिला. प्रवासी या फोनवर बोलत असताना रिक्षाचालकाला म्हणाला की, समोर दवाखान्याजवळ माझा मित्र आहे. त्याला साईबाबाचा फोटो घेऊन या तोपर्यंत मी इथे थांबतो व प्रवाशाच्या बोलण्यावर रिक्षाचालकाने विश्वास ठेवला.

त्याच्या मित्राला फोटो देण्यास दवाखान्याकडे गेला असता, त्या ठिकाणी त्याचा मित्र आढळून आला नाही. त्यामुळे रिक्षाचालक भारती पुन्हा माघारी फिरले तेव्हा त्यांना संबंधित प्रवासी व आपली रिक्षा आढळून आली नाही. त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत भारतीयांनी आजूबाजूच्या नागरिकांना विचारणा केली. त्यानंतर संबंधित प्रवाशी व रिक्षाचा त्यांनी बस स्टेशन रेल्वे स्टेशन तसेच नाशिक रोड च्या विविध भागात शोध घेतला. परंतु रिक्षा मिळून आली नाही. त्यामुळे आपली रिक्षा व मोबाईल संबंधित प्रवाशाने चोरून नेल्याची खात्री झाल्यानंतर भारती यांनी अखेर उपनगर पोलीस स्टेशन गाठले व याबाबत अज्ञात प्रवाशा विरुद्ध तक्रार दाखल केली.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post