नेवासा भाजपमध्ये धुसफूस, स्वार्थी वृत्तीमुळेच मुरकुटे यांचा विधानसभेला पराभव....

 नेवासा भाजपमध्ये धुसफूस, स्वार्थी वृत्तीमुळेच मुरकुटे यांचा विधानसभेला पराभव....
नगर : भाजपने नगर जिल्ह्यात  प्रत्येक तालुक्यात कार्यकारिणीचे पुनर्गठण सुरू केले आहे. नेवासा तालुक्यातही कार्यकारिणी निवडण्यात आली. परंतु या नवीन पदाधिकाऱ्यांमुळे पक्षांतर्गत राजकारण पेटले आहे.

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून ही कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी पदाधिकारी निवडीत वर्चस्व राखले आहे. पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे यांच्यासह कार्यकर्त्यांना बाजूला ठेवल्याने धुसफूस सुरू झाली आहे.

भाजपचे माजी शहराध्यक्ष पोपट जिरे यांनी प्रसिद्धिपत्रक काढून मुरकुटे यांच्यावर आरोप केला आहे. तालुका भाजपमध्ये मुरकुटे, लंघे व जुने निष्ठावंत असे तीन गट पडले आहे. तिसऱ्या गटाने लंघे यांची पाठराखण केली आहे. मुरकुटे यांना पक्षांतर्गत विरोधक वाढल्याचेच हे उदाहरण आहे.

जिरे म्हणाले, " तालुक्यात भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. त्यांचे पंख छाटण्याचे काम यापूर्वी झाले. आताही मुरकुटे यांनी राजकारण केले. स्वार्थी वृत्तीमुळेच त्यांचा विधानसभेला मोठा पराभव झाला. त्यातून धडा घेऊन ते काही तरी शिकतील, असे कार्यकर्त्यांना वाटत होते. परंतु भेंडा गटातील आपली जिल्हा परिषदची जागा कशी सुरक्षित राहील व भविष्यात आपल्याला कुणीही स्पर्धक असू नये, यासाठी माजी आमदार काम करीत आहेत. जनमाणसात स्थान असलेल्या लंघे यांच्या कार्यकर्त्यांना जिल्हा तसेच तालुका कार्यकरणीवर स्थान मिळू नये, यासाठी यशस्वी प्रयत्न केले गेले.

वास्तविक लंघे यांनी विधानसभेला भाजपसाठी प्रामाणिक प्रयत्न करून शिरसगाव गणात आघाडी मिळून दिली होती. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे राजकारण फक्त आपल्या स्वार्थासाठी चालू आहे. त्यांनी विरोधकांसोबत अंधारात युती केलीय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post