शासकीय कार्यालयात मोबाईल वापराबाबत नियमावली जारी, शिष्टाचार आवश्यक

 

शासकीय कार्यालयात मोबाईल वापराबाबत नियमावली जारीमुंबई: सुलभ व वेगवान संपर्क माध्यम म्हणून शासकीय कामकाजात भ्रमणध्वनीचा वापर  अपरिहार्य बनला आहे. तथापि भ्रमणध्वनीच्या वापराबाबत संबंधित अधिकारी / कर्मचार्‍यांकडून अपेक्षित शिष्टाचार पाळण्यात येत नाहीत. अशा प्रकारच्या वर्तणुकीमुळे शासनाची प्रतिमा मलीन होते. सबब शासकीय कामकाज करताना भ्रमणध्वनीच्या वापराबाबत पाळावयाच्या शिष्टाचाराबाबत सूचना  सामान्य प्रशासनाच्यवतीने देण्यात आल्या आहेत.


कार्यालयीन कामासाठी दूरध्वनीचा वापर करताना प्राधान्याने कार्यालयातील दूरध्वनीचा वापर करावा. कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामासाठी आवश्यक असेल तेव्हाच भ्रमणध्वनीचा वापर करावा. भ्रमणध्वनीवर बोलताना सौजन्यपूर्ण भाषेचा वापर करावा. तसेच बोलताना इतरांच्या उपस्थितीची जाणीव ठेवावी, भ्रमणध्वनीवर बोलताना सौम्य आवाजात बोलावे, बोलताना वाद घालू नये तसेच असंसदीय भाषेचा वापर करू नये. कार्यालयीन कामासाठी भ्रमणध्वनीचा वापर करताना लघुसंदेशाचा शक्यतो वापर करावा. तसेच मोबाईल फोनवर बोलताना कमीत कमी वेळेत संवाद साधावा.


भ्रमणध्वनी व्यस्त असताना प्राप्त लोकप्रतिनिधी / वरिष्ठ अधिकार्‍यांच्या कार्यालयीन दूरध्वनीला तात्काळ उत्तर द्यावे. भ्रमणध्वनीवर कार्यालयीन कामकाजासाठी समाज माध्यमांचा वापर करताना वेळेचे व भाषेचे तारतम्य बाळगावे.अत्यावश्यक वैयक्तिक दूरध्वनी कक्षाचे बाहेर जाऊन घ्यावेत. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या कक्षात / बैठकीदरम्यान असताना आपला भ्रमणध्वनी रिंग टोन वरती ठेऊ नये.


वरिष्ठ अधिकार्‍याच्या कक्षात / बैठकी दरम्यान भ्रमणध्वनी तपासणे, संदेश तपासणे, हेडफोन्स वापरणे अशा बाबी टाळाव्यात.कार्यालयीन कामकाजासाठी दौर्‍यावर असताना भ्रमणध्वनी बंद ठेवण्यात येऊ नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post