नगर तालुक्यात पुन्हा हनीट्रॅप, पोलिसांत गुन्हा दाखल


नगर तालुक्यात पुन्हा हनीट्रॅप, पोलिसांत गुन्हा दाखलनगर:  नगर तालुक्यात हनी ट्रॅपचे आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. वडगाव गुप्ता येथे शेतकर्‍यावर हनीट्रॅप झाला आहे. 42 वर्षीय इसमाच्या फिर्यादीवरून याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आरोपी महिलेसह तीघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हनीट्रॅप करणार्‍या महिलेने यासाठी तिच्या नवर्‍याचा देखील आधार घेतला आहे.

फिर्यादी हे पाथर्डी तालुक्यातील आहेत. ते शेतीसह पेंटींगचा व्यावसाय करतात. आरोपींमध्ये संबंधित महिला, किरण खर्डे (दोघेही रा. वडगाव गुप्ता, ता. नगर) आणि गणेश छगन गिर्‍हे (रा. राघेहिवरे, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) यांचा समावेश आहे. तीघे आरोपी फरार असून एमआयडीसी पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी, की आरोपी गणेश गिर्‍हे हा फिर्यादी यांच्या ओळखीचा आहे. आरोपी गिर्‍हे याने हनीट्रॅप करणारी महिला आरोपीला फिर्यादी यांचा मोबाईल नंबर दिला. त्यानंतर संबंधित महिलेने फिर्यादी यांच्या मोबाईलवर पहिल्यांदा मिसकॉल केला असता फिर्यादी यांनी तिला फोन केला. त्यानंतर फोनवर फिर्यादी आणि महिला असे दोघांचे बोलणे होत असे. एके दिवशी महिलेने फिर्यादी यांना फोन करून मी तुम्हाला वडगाव गुप्ता परिसरात पेंटींगचे मोठे काम देते, असे सांगून बोलावून घेतले. तसेच मी कोर्टात कामाला असल्याचे देखील फिर्यादी यांना सांगितले. 

त्यावेळी महिलेने फिर्यादी यांच्याशी जवळीक साधत फोटो काढले. त्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत फिर्यादी यांना ब्लॉकमेल करून दि. 15 जून रोजी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घरी बोलवले. त्यावेळी फियादी तिच्या घरी गेले असता तिचा पती आरोपी किरण खर्डे याने फिर्यादी आणि महिला यांना एकत्र पकडले, असे फिर्यादीला भासवण्यात आले. त्यानंतर फिर्यादी यांना शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन फिर्यादी यांच्याजवळील पाच हजार रूपयांची रोख रक्कम बळजबरीने काढून घेण्यात आली. 

हा सर्व प्रकार आरोपी महिला आणि तिचा पती किरण या दोघांनी फिर्यादी यांना ओळखत असलेला आरोपी गणेश गिर्‍हे याला सांगून मध्यस्थी करण्यासाठी बोलावून घेतले. त्यानंतर दि. 16 जून रोजी आरोपी गणेश गिर्‍हे याने दोन लाख रूपयांचे प्रत्येकी तीन चेक घेतले. त्यातील एका चेकवरील दोन लाख रूपये आरोपींना मिळाले असून दोन चेकवरील चार लाख रूपये अद्यापपर्यत मिळाले नाहीत. मात्र हे दोन चेक आरोपींकडेच आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post