रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार्या गुळवेल काढल्यामुळेे लिव्हरला हानी...आयुष मंत्रालयाचा खुलासा


रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार्या गुळवेल काढल्यामुळेे लिव्हरला हानी...आयुष मंत्रालयाचा खुलासा नवी दिल्ली  : कोरोना संसर्ग पसरू लागल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून, तसंच शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अनेक आयुर्वेदिक औषध  तसंच काढ्यांची शिफारस करण्यात आली. तज्ज्ञांच्या अभ्यासातून निश्चित झाल्यानंतर आयुष मंत्रालयानेही तशा अनेक शिफारशी  केल्या. त्यातच गुडुची/गुळवेल/गिलोय सेवनाच्या शिफारशीचाही समावेश आहे. अनेक डॉक्टर्सही गुळवेलीचा काढा पिण्याचा सल्ला पेशंटना देत आहेत. त्याचा चांगला उपयोगही होत असल्याचं दिसून आलं आहे; मात्र जर्नल ऑफ क्लिनिकल अँड एक्सपरिमेंटल हिपॅटोलॉजी या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका लेखानंतर याबद्दल वाद उत्पन्न झाला आहे. त्या लेखात असा दावा करण्यात आला आहे, की कोरोना कालखंडात गुळवेलीचा काढा सेवन केल्याने अनेक पेशंटचं यकृत अर्थात लिव्हर  खराब झालं आहे. या दाव्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, आयुष मंत्रालयाने या वादाची दखल घेतली असून, या लेखात करण्यात आलेला दावा पूर्णतः चुकीचा असल्याचा निर्वाळा दिला आहे. गिलोय अर्थात गुळवेलीमुळे यकृत खराब होण्याची गोष्ट ही निव्वळ एक अफवा असून, गुळवेलीचा काढा पूर्णतः सुरक्षित असल्याचं आयुष मंत्रालयाने म्हटलं आहे.


Tinospora cordifolia हे गुळवेलीचं शास्त्रीय नाव आहे. गुळवेलीला संस्कृतात गुडुची किंवा गिलोय असंही म्हणतात. आयुर्वेदाच्या दृष्टीने गुळवेल अत्यंत गुणकारी असून, अनेक विकारांवरच्या औषधात गुळवेलीचा समावेश असतो; मात्र वर उल्लेख केलेल्या लेखात अशी माहिती देण्यात आली आहे, की गुळवेलीच्या सेवनामुळे मुंबईत आतापर्यंत सहा जणांचं यकृत निकामी झालं आहे. आयुष मंत्रालयाचं म्हणणं आहे, की या शोधाशी निगडित असलेल्या व्यक्ती त्यांचा शोध योग्य पद्धतीने मांडू शकल्या नाहीत. त्यामुळे त्यावर इतकी चर्चा होत आहे. गुळवेल आणि तिची गुणवैशिष्ट्यं यांचं योग्य विश्लेषण या शोधात करण्यात आलेलं नाही. संबंधित पेशंटना देण्यात आलेलं औषध गुळवेलीचंच होतं की अन्य कोणती जडी-बुटी त्यात वापरण्यात आली होती, ते या शोधकर्त्यांनी तपासून पाहावं, असं आयुष मंत्रालयाने म्हटलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post