दादागिरी...श्रीपाद छिंदमसह अन्य लोकांविरुद्ध गुन्हा दाखल

 

श्रीपाद छिंदमसह अन्य लोकांविरुद्ध गुन्हा दाखल

नगर: दिल्लीगेट  येथील एका ज्यूस सेंटर चालकाला जातीवाचक शिवीगाळ करून त्याच्या टपरीचे नुकसान केल्या प्रकरणी श्रीपाद छिंदमसह  30 ते 40 जणांविरोधात अ‍ॅट्रोसिटीसह अन्य कलमान्वये तोफखाना पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यामध्ये श्रीपाद शंकर छिंदम,  श्रीकांत शंकर छिंदम, महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे (सर्व रा. तोफखाना) व इतर 30 ते 40 अनोळखी इसमांचा समावेश आहे. भागीरथ भानुदास बोडखे (वय 52 रा. नालेगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

9 जुलै रोजी दुपारी दिल्ली गेट येथे घडलेल्या या घटनेची फिर्याद गुरूवारी दाखल झाली. 9 जुलै रोजी दुपारी भागीरथ बोडखे दिल्ली गेट येथील त्यांच्या ज्यूस सेंटरमध्ये काम करत होते. यावेळी श्रीकांत व श्रीपाद छिंदम इतर जमावांसह जेसीबी व क्रेन घेऊन तेथे आले. त्यांनी बोडखे यांना शिवीगाळ करून ज्यूस सेंटरमधील सामानांची फेकाफेक केली. बोडखे यांनी त्यांचा मुलगा प्रतिक व पत्नी कविताला त्याठिकाणी बोलून घेतले. यावेळी श्रीपाद छिंदम बोडखे यांना म्हणाला, उचल सामान, जागा मी घेतली आहे. तसेच श्रीकांत छिंदम याने टपरीमधील सामान बाहेर काढत बोडखे यांना जातीवाचक शिवीगाळ केली.

आरोपींनी बोडखे यांची टपरी जेसीबीच्या सहाय्याने तोडून बाजूला केली व त्याठिकाणी इतर 12 नवीन पत्र्याच्या टपर्‍या उभ्या केल्या असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पुढील तपास शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे करीत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post