करोना आटोक्यात येईना...‘या’22 गावांत आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन


करोना आटोक्यात येईना...22 गावांत आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन नगर: पारनेर तालुक्यातील करोना स्थितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दखल घेतल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तेथे उपाययोजना हाती घेतल्या आहेत. करोनाचा प्रादूर्भाव जास्त असलेल्या २२ गावांत आठ दिवसांचा कडक लॉकडाउन करण्यात आला आहे. सोबतच शंभर टक्के चाचण्या आणि गावातील शाळांमध्ये विलगीकरणही करण्यात येणार आहे. तहसिलदार ज्योती देवरे यांनी सांगितले की, तालुक्यातील निघोज, पठारवाडी, धोत्रे, टाकळी ढोकेश्वर, वडगाव गुंड, शिरसुले, रायतळे, लोणीमावळा, भाळवणी, पिंप्री जलसेन, जामगाव, पठारवाडी, जवळा, हत्तलंखिंडी, पिंपळगाव रोठा, लोणी हवेली, पोखरी, वनकुटे, काकणेवाडी, खडकवाडी, सावरगाव, वाळवणे या गावांत कडक लॉकडाउन लावण्यात आला आहे. पुढील आठ दिवस या गावांत फक्त औषध दुकाने भाजीपाला, दूध आणि कृषी सेवा केंद्र सुरू राहणार आहेत. लग्न, वाढदिवस, उद्घाटन किंवा कोणताही समारंभ परवानगी शिवाय घेता येणार नाही. बाहेरुन आलेले पाहुणे सात दिवस शाळेत विलगीकरणात ठेवण्यात येणार आहेत. विविध ठिकाणी चालक म्हणून काम करणाऱ्या गावातील नागरिकांनी गावात आपल्या घरी न राहता शाळेतील विलगीकरणातच राहायचे आहे. शिक्षक ग्रामसेवक तलाठी मुख्यालय सोडणार नाहीत. वॉर्डनिहाय प्रत्येक गावात शंभर टक्के कुटुंब तपासणी व करोना चाचण्या करण्यात येणार आहेत. यात आढळून आलेल्या रुग्णांना सक्तीने कोविड केअर सेंटरमध्ये आणले जाणार आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post