मुलाने घेतला बापाच्या खुणाचा बदला

 मुलाने घेतला बापाच्या खुणाचा बदला

नारायणगव्हाणचा माजी सरपंच राजाराम शेळके यांंच्या हत्येचे गुढ उकलले असून तत्कालीन उपसरपंच प्रकाश कांडेकर यांचा मुलगा संग्राम कांडेकर याने वडीलांच्या हत्येचा बदला घेतला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. एकट्या संग्राम याने तलवारीने सपासप वार करीत राजाराम यास जागीच ठार केल्याची कबुली त्याने शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाजवळ दिली आहे.

राजकीय वर्चस्व, आपसातील भांडणांच्या कारणावरून नारायणगव्हाणचा माजी सरपंच राजाराम शेळके याने भाडोत्री शार्प शुटरकडून तत्कालीन उपसरपंच प्रकाश कांडेकर यांची हत्या घडवून आणली होती. या प्रकरणी राजाराम शेळके याच्यासह त्याचा मुलगा राहूल तसेच इतर तिघांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. 


कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमिवर राजाराम सह इतर आरोपींना न्यायायलाने पॅरोल रजा मंजुर केली असून वर्षभरापासून राजाराम नाराणगव्हाण येथील त्याच्या शेतामध्ये वास्तव्यास होता. राजाराम शेळके याने वडीलांचा खुन केल्याची सल प्रकाश कांडेकर यांचा मुलगा संग्राम याच्या मनात होती. राजाराम सुटीवर आल्यानंतर त्याचा काटा काढण्याची त्याची योजना होती. त्यासाठी त्याने एक धारदार तलवार उपलब्ध करून ठेवली होती. घटना घडण्यापूर्वी तिन ते चार दिवस संग्राम राजाराम याच्या मागावर होता. राजारामच्या शेताशेजारील उसामध्ये लपून बसून तो एकटा सापडण्याची संग्राम संधी शोधत होता. शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास राजाराम शेतामधील शेततळयाचे काम करणाऱ्या मजुरांना सुचना देऊन एकटाच परतत होता. तिच संधी साधत संग्राम याने पाठीमागून येत राजारामच्या मानेवर तलवारीचा जोरदार प्रहार केला. एकाच प्रहारामध्ये राजाराम जमीनीवर कोसळला. तो कोसळल्यानंतर संग्राम याने त्याच्या मानेवर आणखी दोन वार करून तो पुन्हा उसामध्ये जाउन लपला. पहिल्याच वारमध्ये राजाराम गतप्राण झाला. वार झाल्यानंतर राजाराम याच्या तोंडातून शब्द देखील फुटला नाही. संग्राम यानेच ही माहिती पोलिसांना दिली. संग्राम याने अंगावर दोन टी शर्ट परिधान केले होते. हत्येनंतर वरचा टी शर्ट काढून त्याने उसामध्ये फेकून दिला. जवळील तलवार पुन्हा सोबत घेउन त्याने ती घराजवळील डेअरीमध्ये ठेउन दिली. 


वडीलांच्या हत्येचा बदला घेतल्यानंतर शांत झालेला संग्राम दुचाकीवरून शिरूर येथे गेला. एटीएममधून पाचशे रूपये काढून त्याने पानाचा अस्वाद घेतला. त्यानंतर काही वेळातच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संग्राम यास अटक केली. संग्राम याने शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथाकाकडे गुन्हयाची कबुली दिली असून या गुन्हयाची उकल झाल्याने पोलिस प्रशासनाने सुटकेचा निःश्वास टाकला आहे. 


राहूल शेळके याने दिलेल्या फिर्यादीमधील गणेश भानुदास शेळके तसेच अक्षय पोपट कांडेकर यांना शनिवारी अटक करण्यात आली. गणेश शेळके हा पोलिस दलामध्ये नगर येथे चालक म्हणून कार्यरत आहे. त्यास नगर येथून ताब्यात घेण्यात आले. अक्षय यास श्रीगोंदे तालुक्यातील म्हसे येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. रविवारी दोन्ही आरोपींना न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्यांना २१ जुनपर्यंत पोलिस कोठडी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post