मयत करोनाबाधिताच्या नातेवाईकाला मारहाण, डॉक्टर विरुध्द गुन्हा दाखल

पक्के बिल मागितल्यान मयत करोनाबाधिताच्या नातेवाईकाला मारहाण, डॉक्टर विरुध्द गुन्हा दाखल नगर -  95 हजार रुपयांचे बिल देऊनही आजीचे निधन झाल्याने संतापलेल्या नातेवाईकाने डॉक्टरकडे शासकीय नियमानुसार ऑडिट करून पक्के बिल मिळावे, अशी मागणी केली. यामुळे शहरातील डॉ. प्रतीक वाणी व अन्य दोघांनी त्या नातवास शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना काल दुपारी दोन वाजेच्या सुमारास संगमनेर शहरातील नवीन नगर रस्त्यावरील वाणी हॉस्पिटल समोर घडली.याप्रकरणी डॉ.प्रतिक वाणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, सुमन मारुती खतोडे रा.राजापूर तालुका संगमनेर या महिलेला त्रास होत होता या महिलेच्या वेगवेगळ्या तपासण्या केल्यानंतर ती करोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्याममुळे त्यांना दिनांक 26 एप्रिल रोजी डॉ. प्रतिक वाणी यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना सुमन खतोडे यांचे निधन झाले .खतोडे यांना अ‍ॅडमिट केल्यानंतर पाच दिवस रुग्णालयाच्या जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. खतोडे यांचा नातू संकेत रामनाथ खतोडे याने रुग्णालयाचे 60 हजार व मेडिकल स्टोअर्स चे 35 हजार असे एकूण 95 हजारचे बिल अदा केले होते आजीचे निधन झाल्याने तिचा अंत्यविधी करण्यात आला 95 हजार रुपये खर्च करूनही डॉक्टरांनी आणखी साठ हजार रुपयांच्या बिलाची मागणी केली होती. एवढा मोठा खर्च करूनही आजीचे निधन झाल्याने खतोडे परिवाराने संताप व्यक्त केला होता. अंत्यविधी नंतर खतोडे हा या रुग्णालयात आला शासकीय नियमानुसार ऑडिट करून उपचाराचे जे बील निघेल ते भरण्यास आम्ही तयार आहोत, असे सांगून त्याने पक्क्या बिलाची मागणी केली. यामुळे संतापलेल्या डॉ. प्रतिक वाणी, रुग्णालयातील नर्स मनीषा व मेडिकल स्टोअर्स मधील वामन या तिघांनी संतोष खतोडे यास शिवीगाळ करून मारहाण केली. तुमची बिल भरण्याची लायकी नाही, तुम्ही येथून निघून जा असे म्हणून त्याला ढकलून देण्यात आले. यानंतर संतोष खतोडे याने संगमनेर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post