संपूर्ण अनलॉक नाही, 'या' तालुक्यात दर बुधवारी व‌ शनिवारी जनता कर्फ्यु

 

तूर्तास संपूर्ण अनलॉक नाही, पारनेर तालुक्यात दर बुधवारी व‌ शनिवारी जनता कर्फ्युनगर: करोनाचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी खबरदारी म्हणून पारनेर तालुक्यात दर बुधवारी व शनिवारी जनता कर्फ्यू पाळला जाणार असून दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. व्यापारी असोसिएशन व प्रशासन यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, पारनेर शहरात करोना नियम न पाळणार्‍या दुकानदार व नागरिक यांच्यावर प्रशासनाने कारवाई केली.

पारनेर तालुक्यामध्ये लॉकडाऊनचे निर्बंध खुले करण्यात आल्यानंतर नागरिकांनी रस्त्यावर, दुकानांत मोठी गर्दी केली. त्यामुळे प्रशासनाने व्यापारी असोसिएशनची बैठक घेतली. या वेळी आठवड्यातून दोन दिवस कडकडीत जनता कर्फ्यू पाळण्याबाबत चर्चा झाली. चर्चेत व्यापार्‍यांनी सकारात्मक प्रतिसाद देत दोन दिवस दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्याचे मान्य केले. त्यानुसार बुधवार व शनिवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत.

दरम्यान, करोना निर्बंध खुले झाल्यानंतर पारनेर शहरात अनेक दुकानदारांकडून सोशल डिस्टन्स, मास्क इत्यादीचे पालन होत नव्हते. काही दुकानांमध्ये नागरिक गर्दी करत होते. त्या ठिकाणी प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, नगरपंचायत मुख्य अधिकारी डॉ. सुनिता कुमावत, गटविकास अधिकारी किशोर माने यांच्या संयुक्त पथकाने कारवाई करत पारनेर शहरातील तीन दुकाने सात दिवसासाठी सील केली.

तसेच विना मास्क फिरणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. व्यावसायिकांनी दुकानासमोर प्लास्टिकचा जाड पडदा लावावा, ग्राहकांना उभे राहण्यासाठी दुकानासमोर ठराविक अंतरावर गोल किंवा चौकोन आखावेत. तसेच नियमांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना तहसीलदारांनी या वेळी केल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post