राज्यातील 72 हजार आशा स्वयंसेविका करोनाचे काम बंद करणार...

 आशा व गटप्रवर्तक विविध मागण्यांसाठी 15 जूनला लाक्षणिक संप

16 जून पासून कोरोना साथ रोगाचे सर्व काम बंद करण्याचा इशारा
आयटक संलग्न अहमदनगर जिल्हा आशा कर्मचारी संघटना संपात होणार सहभागी


अहमदनगर (प्रतिनिधी)- आशा व गटप्रवर्तक यांच्या विविध मागण्यांसाठी 15 जून रोजी लाक्षणिक संप करून, 16 जून पासून कोरोना साथ रोगाचे सर्व काम बंद करण्याचा इशारा आयटक संलग्न अहमदनगर जिल्हा आशा कर्मचारी संघटनेच्यावतीने देण्यात आला. या मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे यांना देण्यात आले. यावेळी राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, कार्याध्यक्षा सुवर्णा थोरात, जयश्री ढगे, निशा गंगावने, वंदना पेहरे, कल्पना शेंडे, कामिनी खेतमाळस, सोनाली धाडगे, रुपाली घुसाळे, रुपाली बनसोडे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने संपूर्ण राज्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या विविध समस्यांबाबत 15 व 16 जून रोजी लाक्षणिक संप आणि काम बंद आंदोलन घोषित करण्यात आले आहे. या आंदोलनात अहमदनगर जिल्हा आशा कर्मचारी संघटना देखील उतरणार आहे.
महाराष्ट्र राज्यात 72 हजार आशा स्वयंसेविका व 4 हजार गटप्रवर्तक राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत आहेत. माहितीचे अचूक संकलन व अहवाल सादरीकरण, लसीकरण, व्हीएचएनएससी सभा, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील सभा ही कामे करावी लागतात. त्याकरिता त्यांना दरमहा चार हजार रुपये शासकीय आदेशानुसार मिळाले पाहिजे. पण ती रक्कम पूर्णत: मिळत नाही. याशिवाय त्यांना विविध कामांचा व इतर कामावर आधारित असलेला मोबदला कोरोना पूर्वकाळात मिळत होता. ती रक्कम कामानुसार सरासरी दोन हजार रुपये असते. परंतु त्यांना कोरोना संबंधित काम दररोज आठ तास करुन देखील सदरची रक्कम मिळणे बंद झाली आहे.  2021 पासून ग्रामीण व शहरी भागात आशा व गटप्रवर्तक यांची प्राथमिक आरोग्य केंद्र लसीकरण केंद्र व विलगीकरण कक्ष येथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आठ तासांची ड्यूटी करावी लागत आहे. काही ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन आशांना कोरोना संशयित व्यक्तींची अँटीजेन टेस्ट करावी लागते. दैनंदिन लसीकरणाच्या आढाव्यापासून शासनाचे सर्व योजनांचा तसेच आशांनी केलेल्या सर्व कामाचा दैनंदिन आढावा गटप्रवर्तक यांना वरिष्ठांना सादर करावा लागतो. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा अत्याधिक बोजा पडत आहे. त्या स्वतःच्या जीवावर उदार होऊन कुटुंबाची पर्वा न करता राष्ट्रीय कर्तव्य समजून कोरोना काळात काम करत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post