लूटमार करणारा तोतया पोलीस जेरबंद, श्रीगोंदा पोलिसांची मोठी कामगिरी

 

लूटमार करणारा तोतया पोलीस जेरबंद, श्रीगोंदा पोलिसांची मोठी कामगिरीश्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलू परिसरात शांताई लॉन्ससमोर 16 फेब्रुवारी रोजी पोलीस असल्याची बतावणी करून तीन अज्ञात चोरट्यांनी टेम्पोतील 27 हजारांची रोख रक्कम चोरून नेली होती. या प्रकरणातील एका आरोपीला श्रीगोंदा पोलीसांनी काष्टी-मांडवगण रस्त्यावर सिनेस्टाईल पाठलाग करत ताब्यात घेतले. तपासाअंती त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

अबालू जाफर इरानी (वय 47 वर्षे, रा. शिवाजीनगर, पुणे) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. तालुक्यातील निमगाव खलु परिसरात शांताई लॉन्ससमोर दि. 16 फेब्रुवारी रोजी दौंडकडून नगरकडे जाणार्‍या टेम्पो (एमपी 09 आयएफ 9435) दुचाकीवरून आलेल्या तिघांनी अडविला. टेम्पोचालक लखन दशरथ नायर (वय 21, रा. बागवा, ता. जि. खरगोन, मध्यप्रदेश) याला आपण पोलीस असल्याचे सांगत टेम्पोतील 27 हजारांची रोख रक्कम लांबविली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींविरुद्ध पुरावे मिळविले.

दि. 11 जून रोजी गुन्ह्यातील एक आरोपी मोटारसायकलवर काष्टीमध्ये आल्याची माहिती मिळाल्यानंतर श्रीगोंदा पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. त्यांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो काष्टी मांडवगण रस्त्याने पळून जाऊ लागला. पोलीस कर्मचार्‍यांनी सिनेस्टाईल पाठलाग करत शिरूर पोलीस ठाण्याच्या मांडवगण चौकीच्या कर्मचार्‍यांच्या मदतीने आरोपीला पकडले. अधिक चौकशी केली असता अबालू जाफर इरानी असे आरोपीचे नाव आहे. त्याने दोन साथीदारांसह टेम्पो लुटल्याची कबुली दिल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले.

आठ हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेली यामाहा कंपनीची दुचाकी (एमएच 14 जेजे 5067) असा एकूण 58 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ताब्यात घेतलेला आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, श्रीगोंदा ठाण्याचे निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिलीप तेजनकर, अंकुश ढवळे, मुकेश बडे, प्रकाश मांडगे, किरण बोराडे, दादा टाके, गोकुळ इंगवले, प्रताप देवकाते, कुलदीप घोळवे, योगेश दळवी, अमोल कोतकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली. गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक संतोष फलके करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post