रोहित पवार यांचा गोपीचंद पडळकर यांच्यावर पलटवार....म्हणाले...

 पवार कुटुंबियांवर टिका करूनच त्यांनी आमदारकी मिळवली, रोहित पवार यांचा पडळकरांवर पलटवार



नगर: ‘पवार कुटुंबीयांवर टीका करून ज्यांना आमदारकी मिळाली आहे आणि त्याच निकषावर ती अवलंबून आहे, त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा करणे चुकीचे आहे,’ अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपचे विधानपरिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांना टोला लगावला आहे. ‘मी स्वत:ला कधीही मुख्यमंत्री समजत नाही. तरीही पडळकरांना याचा साक्षात्कार कसा झाला, याचा खुलासा त्यांनीच करावा,’ असे उत्तरही पवार यांनी आपल्यावरील टीकेला दिले.

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि कुटुंबीयांवर सतत टीका केल्यामुळेच पडळकर यांना भाजपने आमदारपद दिले आहे. त्यांच्या याच कामगिरीवर ते अवलंबून आहे. त्यामुळे त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा करण्यात अर्थ नाही. मात्र, त्यांनी सतत टीका करण्यापेक्षा कधी तरी विकास कामांवर बोलावे. त्यांनी स्वत:ही काय विकास केला, हेही सांगावे. मी स्वत:ला कधीही मुख्यमंत्री समजत नाही. तरीही पडळकर तसे म्हणत असतील तर त्यांना हा साक्षात्कार कसा झाला, हे त्यांनीच स्पष्ट करावे. मी आजही स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा छोटा कार्यकर्ता असल्याचे समजतो. आजही कार्यकर्ता आहे, उद्याही कार्यकर्ता राहणार आहे. आपण लोकशाहीमध्ये राहतो. यामुळे जनता ठरवते कोण कोणत्या पदावर योग्य आहे. त्यामुळे मी स्वतःला कोणीही समजत नाही, ते काय समजतात ते माझ्या दृष्टीने फारसे महत्त्वाचे नाही. त्यांनी अशी टीका करण्यापेक्षा आपल्या पक्षाच्या माध्यमातून प्रश्न सोडवून आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्लाही पवार यांनी पडळकरांना दिला. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post