अन्यथा दुबार पेरणी करावी लागेल, कृषी विभागाने केलं सतर्क


पेरणीसाठी काही काळ थांबा, कृषी विभागाचे आवाहननगर: गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने खरीपाची पेरणी खोळंबली आहे. जिल्ह्यात सरासरी 70.3 मिमी पाऊस झाला आहे. आत्तापर्यंत 2.35 टक्केच पेरणी झाली आहे. कमी ओलीवर शेतकरी पेरणी करत असून 100 मिलीमिटर पाऊस झाल्याशिवाय खरीप पिकांची पेरणी करु नका, असे आवाहन प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विलास नवले यांनी केले आहे. अन्यथा बियाणांचे कमी उगवण, खतांबरोबरच मशागतीचा खर्च वाया जाण्याची शक्यता असून दुबार पेरणीची वेळ येवू शकते. 

यंदा मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. समाधानकारक पाऊस झालेल्या तालुक्यात शेतकर्‍यांनी चाड्यावर मुठ धरली. परंतु, गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. जिल्ह्यात 10 हजार 523 हेक्टर क्षेत्रात खरीप पेरणी झालेली आहे. गतवर्षी याच दिवशी जिल्ह्यात सरासरी 102 मिलीमिटर पाऊस झाला होता.            


त्यामुळे खरीप पेरणी मोठ्या प्रमाणात झाली होती. नगर, श्रीगोंदा, शेवगाव, अकोले, पारनेर हे तालुके वगळता उर्वरित जिल्ह्यातील 9 तालुक्यांत पावसाचे प्रमाण कमी आहे. नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन झालेले असून कोकण, व मुंबई या भागात चांगला पाऊस पडल आहे. परंतु, नगर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी 108.2 मिलीमिटर पाऊस अपेक्षित आहे. आत्तापर्यंत 70.30 मिमी (65 टक्के) पावसाची नोंद झाली आहे. किमान 90 ते 100 मिमी पावसाची नोंद झाल्याशिवाय खरीप पेरणी शेतकर्‍यांनी करु नये, अपुर्‍या ओलीवर पेरणी केल्यास बियाण्यांची उगवण होणार नाही. बियाणे व खतांबरोबरच मशागतीचा खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी 100 मिलीमिटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतरच खरी पेरणी सुरु करावी असे कृषी विभागाने म्हटले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post