अजित पवारांनीही मुख्यमंत्री व्हावे....भाजप नेत्याची इच्छा व शुभेच्छा!


सरपंच पदासारखे मुख्यमंत्रीपदही वाटून घ्यावे, अजित पवारांनीही मुख्यमंत्री व्हावे....

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा टोला मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. पटोले यांना येत्या तीन वर्षात मुख्यमंत्री होण्याची संधी आहे. एवढंच नाही तर येत्या तीन वर्षात अजित पवारांनीही मुख्यमंत्री व्हावं, त्यासाठी त्यांना शुभेच्छा आहेत, असं म्हणत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना टोला लगावला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना  दानवे यांनी ही प्रतिक्रिया दिली.


महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आता मुख्यमंत्रीपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्मूल्याची चर्चा सुरू झाली. यावर बोलताना रावसाहेब दानवे यांनी नाना पटोले आणि अजित पवार यांना चिमटा काढला. नाना पटोले यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायचं आहे. अनेक वेळा त्यांनी हे माझ्याकडे बोलून दाखवलं आहे. त्यांना त्यासाठी शुभेच्छा आहेत. मात्र त्यासाठी त्यांच्याकडे फक्त तीन वर्षाचा काळ आहे. या तीन वर्षात त्यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावं. त्यानंतर त्यांना संधी मिळणार नाही. कारण 2024 नंतर भाजपची स्वबळावर सत्ता येईल. असा दावा रावसाहेब दानवे यांनी केलाय.

 

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही राजकीय कारकीर्द मोठी आहे. ते राष्ट्रवादीचे गटनेते आहेत. त्यांनीही मुख्यमंत्री झालं पाहिजे. गावात ग्रामपंचायतीमध्ये लोक एक एक वर्ष किंवा दोन दोन वर्ष सरपंचपद वाटून घेतात त्याप्रमाणे महाविकास आघाडीतील पक्षांनी मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावं, असा सल्ला दानवे यांनी दिलाय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post