15 लाख लसींसाठी आ.संग्राम जगताप यांची मनपाला महत्त्वपूर्ण सूचना

15 लाख लसींसाठी आ.संग्राम जगताप यांची मनपाला महत्त्वपूर्ण सूचना नगर  - नगर शहराची अंदाजित लोकसंख्या लक्षात घेता नागरिकांचे  दोनवेळा लसीकरण होईल, यादृष्टीने मुंबई महानगरपालिकेकडून मार्गदर्शन घेऊन अहमदनगर महानगरपालिकेने कोविड -19 वर प्रभावी अशा 15 लाख लसींचे डोस खरेदीसाठी ग्लोबल ई-निविदा प्रसिद्ध करावी, अशी मागणी नगर शहराचे लोकप्रतिनिधी आ. संग्राम जगताप यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांना दिलेल्या पत्रात केली आहे.

नगर शहरात मोठ्याप्रमाणात कोविड 19चा प्रादूर्भाव वाढत होता व मृत्यूदरही वाढलेला होता. यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. नगर शहरात महानगरपालिकेमार्फत सध्या लसीकरण सुरू करण्यात आले आहे. परंतू  शहराची लोकसंख्या पाहता उपलब्ध होणारी लस ही अत्यल्प स्वरुपात आहे. यामुळे लसीकरण केंद्रांवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. सद्यस्थितीत इतर बाबींपेक्षा नागरिकांचा जीव वाचविणे हे महत्वाचे आहे. त्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहे. अहमदनगर  हानगरपालिकेनेही मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर कोविड 19वर प्रभावी असे 15लाख लसींचे डोस खरेदी करण्यासाठीचे ग्लोबल ई-निविदा प्रसिद्ध करावी. या लस खरेदीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस व या प्रस्तावाला अन्य पक्षातील नगरसेवक अनुकूल असल्यास त्यांच्या नगरसेवक निधीतून लस खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून घेण्यात यावा. तसेच महाराष्ट्र शासनामार्फत मलाही कोविड 19च्या उपाययोजनांसाठी निधी उपलब्ध झालेला आहे. तोही निधी ही लस खरेदी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आ. जगताप यांनी मनपा आयुक्तांना दिलेल्या या पत्रात म्हटले आहे.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post