अन्नत्याग आंदोलनाची दखल...कर्तव्यावर असलेल्या शिक्षकांना रांगेत न थांबता मिळणार लस

 शिक्षकांचा लसीकरणाचा मार्ग मोकळा

शिक्षक परिषदेच्या अन्नत्याग व आत्मक्लेश आंदोलनाची दखल
कर्तव्यावर असलेल्या शिक्षकांना रांगेत न थांबता मिळणार लसनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या संकटकाळात कर्तव्य बजावणार्‍या शिक्षकांना फ्रन्टलाईनचा दर्जा देऊन त्यांचे लसीकरण करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (दि.18 मे) महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शिक्षकांनी घरात अन्नत्याग व आत्मक्लेश आंदोलन केले होते. सदर प्रश्‍नी शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर व अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांची भेट घेतली असता त्यांनी सर्व तालुक्याचे तहसिलदार, गटविकास अधिकारी व सर्व तालुका आरोग्याधिकारी यांना कोरोना काळात काम करणार्‍या शिक्षकांना रांगेत न थांबवता प्राधान्याने लस देण्याचे आश्‍वासन दिले. तर लस देण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांचे लेखी पत्र प्राप्त झाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.    
शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राज्य संपर्कप्रमुख रावसाहेब रोहोकले, जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे, विकास मंडळाचे नेते संजय शिंदे, गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष विकास डावखर यांनी सदर प्रश्‍नी अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांची जिल्हा परिषदेत भेट घेऊन या प्रश्‍नावर चर्चा केली. अधिकार्‍यांनी सकारात्मक भूमिका घेऊन शिक्षकांना प्राधान्याने लस देण्याचे आश्‍वासन दिल्याने, शिष्टमंडळाने घरी अन्नत्याग व आत्मक्लेश आंदोलन करणारे शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे व राज्य उपाध्यक्ष संजय शेळके यांचे उपोषण सरबत देऊन सोडवले. 
शिक्षक परिषदने कोरोना काळात कार्य करणार्‍या शिक्षकांचे लसीकरण होण्यासाठी मागणी लाऊन धरली होती. यासंदर्भात शिक्षक आमदार नागो गाणार, आमदार संजय केळकर, आमदार डॉ. सुधीर तांबे, राज्याध्यक्ष राजेश सुर्वे  यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन पाठविले होते. सदर प्रश्‍नाची जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन शिक्षकांचा लसीकरणाचा मार्ग मोकळा केल्याबद्दल शिक्षक परिषदेच्या वतीने प्रशासन, आंदोलनास पाठिंबा देणारे विविध संघटनेचे पदाधिकारी व आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व शिक्षकांचे आभार मानले आहे.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post