राजीव सातव यांचा थक्क करणारा प्रवास...2014 च्या मोदी लाटेतही विजय, चार वेळा ‘संसदरत्न’ सन्मान

राजीव सातव यांचा थक्क करणारा प्रवास...2014 च्या मोदी लाटेतही विजय, चार वेळा ‘संसदरत्न’ सन्मान

 


मुंबई : काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे कोरोना संसर्गानंतर उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेसच्या संघटनात्मक राजकारणात राजीव सातव हे नाव सातत्याने चर्चेत होते. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय एवढ्यापुरताच त्यांची ओळख मर्यादित नव्हती. तर राजीव सातव यांनी लोकांमधून निवडून येण्याचीही कामगिरी करून दाखवली होती. 2014 मध्ये संपूर्ण देशात मोदी लाटेचा प्रचंड जोर असतानाही राजीव सातव यांनी हिंगोली मतदारसंघातून विजय मिळवून दाखवला होता.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि राजीव सातव हे दोनच खासदार निवडून आले होते.2014 मध्ये राजीव सातव यांना लोकसभेची उमेदवारी दिली गेली त्यावेळी हिंगोली मतदारसंघ हा राष्ट्रवादीकडे होता. मात्र, राजीव सातव यांच्यासाठी त्यावेळी काँग्रेसने राष्ट्रवादीशी वाटाघाटी केल्या होत्या.

45 वर्षीय राजीव सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) चे गुजरात प्रभारी होते, तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक होते. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या. राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने 2017 मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं. फेब्रुवारी 2010 ते डिसेंबर 2014 या काळात त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं. काँग्रेस पक्ष आणि गांधी घराण्यावर असलेल्या निष्ठेमुळे त्यांचं पक्षात वजन होतं. याशिवाय ते थेट राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी कोणत्याही मुद्द्यांवर बोलत असायचे.

हिंगोलीच्या खासदारपदी असताना सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला. संसदेत 1075 प्रश्न विचारत 205 वादविवादांमध्ये सातव सहभागी झाले होते. राजीव सातव यांची 81 टक्के उपस्थितीही उल्लेखनीय होती. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

राजीव सातव यांनी स्वतःहून 2019 मधील लोकसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र गेल्या वर्षी झालेल्या राज्यसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या कोट्यातून सातव यांची खासदारपदी वर्णी लागली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post