नगर तालुक्यातील ‘या’ महिला सरपंचांचे पद रद्द, विभागीय आयुक्तांनी केले शिक्कामोर्तब

 सारोळा कासारच्या सरपंचाचे पद रद्दचा आदेश विभागिय आयुक्तांकडून कायम


अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवत नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती कारवाई  

 


नगर - सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवत नगर तालुक्यातील सारोळा कासार ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.आरती रविंद्र कडूस यांचे सरपंचपद जिल्हाधिकाऱ्यांनी दुसऱ्यांदा रद्द केल्यानंतर कडूस यांनी नाशिक विभागीय आयुक्तांकडे केलेले अपिल आयुक्तांनी फेटाळून लावले असून जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी २२ जानेवारी २०२१ रोजी पद रद्दचा पारित केलेला आदेश कायम केला आहे.

ऑक्टोबर २०१७ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सौ.आरती रविंद्र कडूस या सारोळा कासार ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवडून आल्या होत्या. यानंतर गावातील भाऊसाहेब माधव कडूस यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सरपंच आरती कडूस यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केले असल्याची तक्रार करून त्यांचे सरपंच पद रद्द करण्याची मागणी केली होती. 

आरती कडूस यांचे पती रविंद्र कडूस हे नगर तालुका पंचायत समितीचे वाळकी गणाचे सदस्य आहेत.सारोळा कासार  ग्रामपंचायत हद्दीत त्यांच्या कुटुंबियांच्या नावे जागा असल्याची नोंद ग्रामपंचायत रेकॉर्डला आहे. मात्र प्रत्यक्षात त्यांनी त्यांच्या जागे व्यतिरिक्त सार्वजनिक जागेत अतिक्रमण केलेले आहे. त्यामुळे सरपंच आरती कडूस यांचे सरपंचपद रद्द करावे अशी मागणी भाऊसाहेब कडूस यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचेकडे केली होती. या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नगर तालुका भूमिअभिलेख कार्यालयाने गावातील पंचांच्या उपस्थितीत या अतिक्रमीत जागेची मोजणी करुन अहवाल सादर केला. या अहवालावरून अतिक्रमण केल्याचे समोर आले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच आरती कडूस यांचे सरपंच पद दि.३ जुलै २०२० रोजी रद्द केले होते. या निर्णयाविरोधात कडूस यांनी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात अपिल केले. त्यांचे अपिल अंशतः मान्य करत विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना फेरचौकशी करून निर्णय देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या समितीने केलेल्या फेरचौकशीत कडूस यांचे अतिक्रमण सिद्ध झाल्याने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दि.२२ जानेवारी २०२१ रोजी कडुस यांना ग्रामपंचायत सरपंच व सदस्य राहण्यास अपात्र ठरवुन त्यांची निवड रद्द केली होती.

त्यानंतर कडूस यांनी पुन्हा नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात अपील केले. त्यावर अप्पर आयुक्त भानुदास पालवे यांच्यासमोर सुनावणी झाली. या वेळी कडूस यांचे अपील फेटाळून लावण्यात आले व जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला पद रद्दचा आदेश कायम करण्यात आला. या प्रकरणात तक्रारदार भाऊसाहेब माधव कडूस यांच्या वतीने अॅड. राहुल जोंधळे यांनी बाजू मांडली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post