करोना विषाणू हा जैविक युध्दाचाच भाग आहे....

 करोना विषाणू हा जैविक युध्दाचाच भाग आहे, भारताने सर्व प्रकारच्या युध्दांसाठी सज्ज राहण्याची गरज : ले.ज.दत्तात्रय शेकटकर


जनजाती (वनवासी) कल्याण आश्रम आयोजित कै.ग.म.मुळे स्मृती व्याख्यानमाला, पुष्प दुसरेनगर : एकविसाव्या शतकात सुरक्षेचे स्वरुप बदलत चालले आहेत. फक्त सीमांवर भूतलावरुन होणारे आक्रमण म्हणजे युध्द नसून आता जगभर थैमान घालणारी करोना महामारी ही जैविक युध्दाचा भाग आहे. चीनच्या वूहानमध्ये अनेक वर्षांपासून जैविक युध्दाचे प्रयोग चालू असून करोना विषाणू हा तिथल्या प्रयोगशाळेतून अपघाताने किंवा प्रयोग म्हणून बाहेर आला आहे. या विषाणूमुळे एकही गोळी न झाडता जगभरात 37 लाख लोकांचा मृत्यु झाला. आताच्या काळात आपल्या संरक्षणासाठी बाहेरुन कोणी मदत करणार नाही. आपल्याला स्वत:लाच सज्ज, सामर्थ्यशाली व्हावे लागेल. यामुळेच आपल्या देशाचे पंतप्रधान स्वावलंबी भारताचा मंत्र देत आहेत. स्वावलंबी भारतच सर्वार्थाने आत्मनिर्भर भारत बनू शकतो हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे, असे मत ले.जनरल (सेवानिवृत्त) दत्तात्रय शेकटकर यांनी व्यक्त केले.


जनजाती (वनवासी) कल्याण आश्रम, नगर शाखा आयोजित कै.ग.म.मुळे स्मृती व्याख्यानमालेत ‘ भारताची संरक्षण सिद्धता आणि आव्हाने’ विषयावर दुसरे पुष्प गुंफताना शेकटकर बोलत होते. या व्याख्यानमालेचे यंदा 11 वे वर्ष असून लॉकडाऊनमुळे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून यंदा व्याख्यानमाला होत आहे. प्रारंभी विशारद अशोकराव पेटकर यांनी स्वागत केले.  प्रीति प्रशांत आढाव यांनी प्रास्ताविक करीत जनजाती कल्याण आश्रम व ग.म.मुळे स्मृती व्याख्यानमालेचा आढावा सादर केला. ओंकार देऊळगावकर यांच्या विषयानुरूप गीताने व्याख्यानाची सुरुवात झाली.


संरक्षण सिध्दतेवर बोलताना शेकटकर यांनी सांगितले की, आताची कोविड महामारी ही जैविक युध्दाचा परिणाम आहे. ती बाहेरुनच आली आहे. देशांतर्गत माओवाद, नक्षलवाद ही अंतर्गत डोकेदुखी आहेत. त्यालाही देशातूनच प्रोत्साहन पाठबळ मिळते. अशा सर्वांचा सामना करायचा तर कूटनिती आवश्यक असते. 2020 ला चीनने भारताच्या गलवान क्षेत्रात आक्रमण केले. आपल्या सरकारने कठोर पावले उचलले तर विरोधकांनी त्यावर टिका केली. चीनने माघार घेतली पण तो युध्दखोरी सोडणार नाही. तो कोणत्या क्षेत्रावर युध्द करेल हे सांगता येत नाही. त्यासाठीच युध्दासाठी अहोरात्र तयार राहिलेच पाहिजे. पुलवामानंतर भारताने थेट बालाकोटवर सर्जिकल स्ट्राईक केले. तेव्हा पाकिस्तानाही कळून चुकले की भारतापासून सावध रहायची गरज आहे. पाकिस्तान इतका अस्थिर झाला आहे की, येणार्‍या काळात पाकिस्तानचे चार तुकडे झालेले नक्कीच दिसतील. चीनही येणार्‍या काळात स्वत:च उध्वस्त होणार आहे. सोव्हिएत युनियनची जशी शकले झाली तसाच प्रकार चीनबाबत होणार आहे.


दशतवाद, आतंकवाद हा सुध्दा युध्दाचाच एक प्रकार आहे. ईशान्य भारतात स्वातंत्र्यानंतर फुटीरवादी युध्द सुरु झाले. ती वृत्ती आजही कायम आहे. नागालॅण्ड, मिझोराम, मणिपूर, आसाम या राज्यांत  फुटीरतावादाची बीजे चीन, ब्रिटनमधून पेरली गेली. नक्षलवादही बंगाल, नेपाळच्या सीमेवरुन सुरु झाला. तो पश्चिम बंगाल, बिहार, छत्तीसगड, आंध्रप्रदेशात पसरला. 2011 मध्ये रामलीला मैदान दिल्लीत माओवाद हा शब्द वापरण्यात आला. लाल किले पे लाल निशाण हा नारा कम्युनिस्टांनी दिला. हा कुविचार भारतात सर्व दूर पसरला आहे. हे सुध्दा एक देशाच्या सुरक्षेसमोरील आव्हान आहे.


प्रत्येकाच्या मनात आज स्वत:च्या सुरक्षेबाबत भिती आहे. मुलगी सायंकाळी घरी लवकर नाही आली तरी पालक घाबरतात. सातच्या आत घरात अशी मानसिकता तयार झाली. मनावैज्ञानिक युध्दाचा हा प्रकार आहे. कारण युध्द प्रथम मनात जिंकले तरच रणांगणात जिंकता येते. स्वातंत्र्य मिळाल्यावर ते कायम ठेवणं हे फार महत्त्वाचे आहे. यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात. त्यामुळेच आजच्या भारताला विश्वगुरु बनायचे असेल तर आपल्याकडचे महान तत्वज्ञान, विश्वबंधुत्त्वाची शिकवण जगात पोहोचली पाहिजे. यात युवा वर्गाची भूमिका महत्त्वाची आहे. भारताला सशक्त, समृध्द, स्वावलंबी राष्ट्र बनविण्यासाठी युवा पिढीने पुढाकार घेतला पाहिजे. राष्ट्रहिताचा विचार केला पाहिजे, असेही शेकटकर यांनी सांगितले.


शेवटी पसायदानाने व्याख्यानाची सांगता झाली. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post