खा.राजीव सातव यांना अखेरचा निरोप...कळमनुरीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

खा.राजीव सातव यांना अखेरचा निरोप...कळमनुरीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार हिंगोली : कॉंग्रेसचे  राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११.३० वाजेच्या दरम्यान कळमनुरी येथे अंत्यविधी करण्यात आले. मुलगा पुष्कराज याने त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. त्यांच्या कुटुंबीयांसह हजारो चाहत्यांनी अंत्यदर्शन घेऊन साश्रूनयनांनी त्यांना निरोप दिला. अत्यंत शोकाकुल वातावरणात अनेकांना भावना अनावर झाल्या होत्या. खा. राजीव सातव यांना २३ एप्रिल राेजी त्यांना पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्रास वाढल्याने २६ एप्रिल रोजी त्यांना अतिदक्षता विभागात हलवून व्हेंटिलेटरवर ठेवले होते. कोरोनातून बरे झाल्यानंतर त्यांना फुप्फुसात न्यूमाेनियाचा संसर्ग झाला. प्रकृती बिघडत गेली व रविवारी पहाटे खा. सातव यांनी अखेरचा श्वास घेतला. यानंतर रविवारी रात्री त्यांचे पार्थिव कळमनुरी येथे त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जिल्ह्यातीलच नव्हे तर देशभरातून चाहत्यांनी कळमनुरी येथे सोमवारी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. सकाळी ८ वाजेपासून निवास्थानासमोर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी कोरोना नियमांचे पालन, सामाजिक अंतर ठेवत त्यांचे हजारो चाहते, काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध पक्षातील नेते येथे अंत्यदर्शनासाठी आले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post