प्राथमिक शिक्षकांनी संघटनात्मक मतभेद बाजूला ठेवून एवढ्या लाख रुपयाचे ऑक्सीजन मशीन प्रदान

 प्राथमिक शिक्षकांनी संघटनात्मक मतभेद बाजूला ठेवून एवढ्या लाख रुपयांचा ऑक्सीजन मशीन प्रदानश्रीरामपूर तालुका प्राथमिक शिक्षकांची आदर्श कामगिरी

साडे तीन लाख रुपयाचे ऑक्सीजन मशीन केले प्रदान

श्रीरामपूर (प्रतिनिधी) कोरोनाच्या भीषण महामारी मध्ये सर्वत्र हा हा कार निर्माण झालेला असताना कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मदतीला अनेक घटक पुढे येत आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी आपले संघटनात्मक मतभेद बाजूला ठेवून एक आदर्श पाऊल उचलत तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून दोन दिवसातच साडेतीन लाख रुपये जमा केले. या पैशातून सात ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन खरेदी करून त्याचे वितरण ग्रामीण रुग्णालय व नगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राला करण्यात आले.

शिरसगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला पाच ऑक्सीजन मशीन चे वितरण तालुक्याचे कर्तबगार तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश बंड, डॉ.तौफिक शेख, डॉ. जयश्री वमने यांनी या मशीनचा स्वीकार केला. शिक्षक समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते. 

तहसीलदार प्रशांत पाटील यांनी तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक करताना समाज घडविणारा शिक्षक समाजाच्या संकटसमयी धावून आला याचे मोठे समाधान असल्याचे सांगितले. तालुक्यातील शिक्षकांना लसीकरण संदर्भात योग्य ते पाऊल उचलण्यात येत असून तालुक्यातील सर्व शिक्षकांना लसीकरणात प्राधान्य देण्याबाबत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे डॉक्टरांना कळविण्यात येईल असे ते म्हणाले. 

ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ.योगेश बंड यांनी या ऑक्सीजन मशीनची रुग्णालयाला खूप आवश्यकता होती. यामुळे रुग्णांची खूप सोय झाली असे सांगून तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी चांगली कामगिरी करून आज ज्या कामाची खरी गरज आहे ते कार्य केले असल्याचे सांगितले.

नगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राला दोन ऑक्सीजन मशीनचे वितरण नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांचे हस्ते मुख्याधिकारी गणेश शिंदे, नगरपालिका रुग्णालयाचे डॉ.सचिन पर्हे, डॉ.मुंदडा यांच्या ताब्यात देण्यात आल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अलत्मश पटेल, केतन खोरे,नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटारे हे देखील उपस्थित होते.

तालुक्यातील शिक्षकांच्या कामगिरीचे कौतुक करताना नगराध्यक्षा आदिक यांनी शिक्षक हा समाजाचा आदर्श आहे आणि तालुक्यातील सर्व शिक्षकांनी हे एक आदर्श कार्य केले आहे असे सांगून या सामाजिक कार्याबद्दल तालुक्यातील सर्व शिक्षकांचे आभार मानले.

मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी कर्मचारी म्हणून सर्वजण योगदान देतच आहेत. परंतु शहर व तालुक्यातील शिक्षकांनी कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी एवढी मोठी रक्कम जमा केली आणि राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक आदर्श निर्माण केला असे सांगितले. प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर प टारे यांनी चांगल्या कामासाठी सर्व शिक्षक संघटना आपसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र झाले त्यातूनच एवढा मोठा निधी निर्माण झाला या बद्दल आनंद व्यक्त करून या उपक्रमा बद्दल तालुक्यातीत शिक्षकांचे कौतुक केले.

श्रीरामपूर तालुक्यातील जिल्हा परिषद व नगरपालिका शिक्षकांच्या वतीने तसेच काही निवृत्त शिक्षक बंधू - भगिनीनीं ही निधी दिला . निधी संकलन करण्यासाठी तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोलाचे परिश्रम घेतले आणि अवघ्या दोन दिवसात एवढा मोठा निधी निर्माण करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला याबद्दल तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post