प्राथमिक शिक्षकांनी कोविडग्रस्तांसाठी स्वयंस्फूर्तीने उभारला लाखोंचा निधी

 प्राथमिक शिक्षकांनी निर्माण केला नवा आदर्श

कोविडग्रस्तांसाठी  स्वयंस्फूर्तीने उभारला लाखोंचा निधी
अहमदनगर (प्रतिनिधी) - या ना त्या कारणाने कधीकधी टीकेचे धनी ठरणाऱ्या प्राथमिक शिक्षकांनी सध्याच्या परिस्थितीमध्ये सामाजिक कर्तव्याच्या भावनेतून जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये कोरोनाग्रस्त लोकांसाठी लाखो रुपयांचा निधी स्वयंस्फूर्तीने निर्माण केला असून यातून वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. प्राथमिक शिक्षकांनी या माध्यमातून समाजापुढे वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

अकोले तालुक्यातील प्राथमिक  शिक्षकांनी मिळून स्वतः एक कोवीड केअर सेंटर निर्माण केले असून त्यासाठी सुमारे पंधरा लाख रुपयाचा निधी उभारला आहे.या सेंटरला तालुक्यातून इतरही लोक आता मदत करीत आहेत.

संगमनेर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी सिंधू लॉन्स तसेच चंदनापुरी येथे दोन कोवीड सेंटर उभारले असून तेथे ऑक्सिजन बेडची सुविधा निर्माण केली आहे. यासाठी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनीआठ ते दहा लाख रुपयांचा निधी उभारला आहे.

 कोपरगाव व राहाता तालुक्यातील शिक्षकांनी देखील कोरोनग्रस्तांच्या मदतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी उभारणी करून त्या माध्यमातून आवश्यक त्या वस्तू पुरविले आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील शिक्षकांनी येथील ग्रामीण रुग्णालय तसेच नगरपालिकेचे नागरी आरोग्य केंद्र यासाठी ऑक्सीजन मशीन घेण्यासाठी जवळपास साडेतीन लाख रुपयांचा निधी तीन दिवसात निर्माण केला आहे. या कामी तालुक्यातील सर्व संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन हा निधी निर्माण केला. ऑक्सीजन मशीनची ऑर्डर दिली असून एक दोन दिवसात ते उपलब्ध होणार आहे.

शेवगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी सुमारे पाच लाख रुपयांपेक्षा जास्त निधी कोवीड सेंटर साठी स्वयंस्फूर्तीने जमा केला. पाथर्डी तालुक्यातही शिक्षकांनी सेंटर साठी निधी निर्माण केला. नेवासा तालुक्यातील शिक्षकांनी भेंडा येथे कोवीड सेंटर साठी तीस बेड तसेच इतर साहित्य उपलब्ध करून दिले.

 राहुरी तालुक्यातील शिक्षकांनी मोठ्या प्रमाणावर निधी राज्यमंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांच्या सुपूर्द केला. नगर तालुक्यात देखील लाखो रुपयांचा निधी निर्माण करून कोवीडशी संबंधित औषधी तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यां साठी आवश्यक साहित्य खरेदी केले. अहमदनगर मध्ये दोन वेगवेगळे निधी यासाठी उभारले आहे. दोन्ही कडे तालुक्यातील व जिल्ह्यातील शिक्षकांनी उदार हस्ते मदत केली आहे.

 पारनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार निलेशजी लंके यांनी सुरू केलेल्या कोवीड केंद्रासाठी पारनेर तालुक्यातील शिक्षकांनी मोठा निधी निर्माण केला. श्रीगोंदा घारगाव येथे देखील अशाच प्रकारचे काम प्राथमिक शिक्षकांनी हाती घेतले आहे.

 जामखेड तालुक्यातील आरोळे बंधू-भगिनींनी सुरू केलेल्या कोवीड केंद्रासाठी तालुक्यातील शिक्षकांनी मोठा निधी निर्माण केला. या पद्धतीने जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचा निधीचा आकडा सुमारे सत्तर लाखापेक्षा जास्त असून नजीकच्या काळात तो एक कोटीचा टप्पा ओलांडणार आहे. विशेष बाब म्हणजे या निधीसाठी सर्व तालुक्यातील सर्व शिक्षकांनी आपल्यातील संघटनात्मक राजकारण बाजूला ठेवून एकत्रितपणे हा निधी निर्माण केला. जिल्ह्यात चमकोगिरी करणारे मोठे शिक्षक नेते मात्र सर्वांनीच बाजूला ठेवले ही एक विशेष उल्लेखनीय बाब आहे. याशिवाय प्राथमिक शिक्षक आपला एकदिवसाचा पगार कोरोनाग्रस्तांसाठी मुख्यमंत्री निधीला  देणार आहेत. एकंदरीत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक,शिक्षिका यांनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून शासनाचे कोणतेही आदेश नसताना केवळ एकमेकांच्या चर्चेतून आणि केलेल्या आवाहनातून हा लाखो रुपयांचा निधी निर्माण केला. त्याचा फायदा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांना होत आहे. 

याशिवाय जिल्ह्यातील बहुतांश प्राथमिक शिक्षक हे कोरोना ड्युटी करत आहेत. काही ठिकाणी सुरू असलेल्या कोविड सेंटरवर नेमणुका आहेत. काही जण पोलिसांना मदत करीत आहेत तर अनेक महिला शिक्षिका आशा सेवकांसोबत जाऊन घरोघर कोरोना ग्रस्तांचा सर्वे करीत आहेत.उर्दू शिक्षक ही सरसावले

जिल्ह्यातील सर्व शिक्षक कोवीडग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे आलेले आहेत. त्यात जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी रमजान पठाण यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जिल्ह्यातील उर्दू माध्यमाच्या शिक्षकांनी देखील स्वतंत्र निधी उभारला असून गेल्या तीन दिवसात यामध्ये सुमारे चार लाख रुपये जमा झाले आहे. येत्या आठवड्याभरात  हा निधी दहा लाखाचा टप्पा पार करील अशी अपेक्षा असून या रकमेतून जिल्ह्यातील कोवीड सेंटर साठी आवश्यक साहित्य, औषधे व इतर वस्तू मदत म्हणून दिल्या जाणार आहेत.उर्दू शिक्षकांनी प्रत्येक तालुक्यातील स्थानिक निधी मध्ये सुद्धा सहभाग नोंदवला आहे. सध्या रमजान महिना सुरू असल्यामुळे या पवित्र पर्वात सामाजिक मदत म्हणून उत्स्फूर्तपणे हा निधी निर्माण केला गेला आहे.सदर निधी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते दिला जाणार आहे अशी माहिती शिक्षक बँकेचे चेअरमन सलीमखान पठाण यांनी दिली.सध्या शाळा बंद असल्या तरी गेले वर्षभर शिक्षकांचे काम बंद नाही. ऑनलाईन स्वाध्यायाच्या माध्यमातून तसेच घरोघरी जाऊन मुलांचे होमवर्क तपासण्यात आले असून आता ही कोरोना ड्युटीच्या माध्यमातून सुद्धा शिक्षक आपले कार्य करीत आहेत. शिक्षक करीत असलेले कार्य आणि त्यांनी स्वतः निर्माण केलेला हा निधी म्हणजे शिक्षकांच्या विरोधात बोलणाऱ्यांना सणसणीत चपराक आहे. 

   अंबादास गारुडकर  शिक्षक नेते

जल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन हे दिशादर्शक असे कार्य उभे केले आहे.मात्र जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षकांनी अशा प्रकारे कोणतेही कार्य सुरू केल्याचे अद्याप तरी दिसून येत नाही. सहा अंकी पगार घेणारे हे उच्च शिक्षण विभागातील शिक्षक कोरोनाच्या या संकट काळात आता काय योगदान देतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post