कोविड सेंटरबाबत लोकांच्या मनात भिती पसरेल असा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल...संबधिताला प्रशासनाकडून नोटिस

कोविड सेंटरबाबत लोकांच्या मनात भिती पसरेल असा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल...

संबधिताला प्रशासनाकडून नोटिस पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील शरदचंद्र पवार कोविड  सेंटरबद्दल आक्षेपार्ह व आमदार नीलेश लंके यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांना तहसीलदार ज्योती देवरे यांनी मंगळवारी नोटीस बजावली आहे. कोविड सेंटरबद्दलचा एक व्हिडिओ उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी सोशल मीडियावर टाकून राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, सरपंच राहुल झावरे, पिंटु गोडसे आदींनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाच्यावतीने तहसीलदार ज्योती देवरे यांनी ही नोटीस बजावली आहे.

नोटीसमध्ये म्हटले आहे की, पारनेर तालुक्यात कोविड 19 या विषाणूचा प्रसार रोखणेकामी तालुक्यातील प्रशासनासोबत आमदार, जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, नगरसेवक, सरपंच, सर्व राजकीय पक्ष एकत्रितरित्या समन्वय साधुन तालुक्यात कोरोना या राष्ट्रीय आपत्तीशी एकजुटीने लढत आहेत. मात्र आपण दि. 17 मे रोजी तालुक्यातील शासकीय कोरोना सेंटर भाळवणी याबाबत लोकांमध्ये भीती निर्माण होईल अशा पद्धतीचा व्हिडीओ प्रसारीत करुन लोकांमध्ये घबराट निर्माण केलेली आहे. लोकांनी कोविड सेंटरला येऊ नये व उपचार घेऊ नये असे लोकांना आवाहन केले आहे. लोकांना उपचारापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला आहे. आपणास सदर कोरोना सेंटरच्या कामकाजाबाबत काही तक्रार होती तर आपण जबाबदार नागरिक म्हणून त्याबाबतची तक्रार लेखी पत्राद्वारे तहसिलदार पारनेर यांच्याकडे करणे अपेक्षित होते. तथापि, तालुक्यात कोरोना आपत्कालीन परिस्थिती असताना आपण कोणतीही शहानिशा न करता अविचाराने चुकीचा व्हिडीओ प्रसारीत करुन जनतेची दिशाभूल करणेचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांमध्ये व त्यांचे नातेवाईकांमध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी आपणाविरुद्ध फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, पारनेर यांच्याकडे सादर का करण्यात येऊ नये याबाबतचा लेखी खुलासा बुधवारी सकाळी 11.00 वाजेपर्यंत माझ्याकडे सादर करावा, अन्यथा प्रस्तावित कारवाई करण्यात येईल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post