बोलेरो आणि हुंडाई कारचा भीषण अपघात...४ जण जखमी

 

बोलेरो आणि हुंडाई कारचा भीषण अपघात...४ जण जखमीनगर: राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गावात तळेगाव रस्त्यावर शुक्रवारी सकाळी बोलेरो आणि हुंडाई कारच्या भीषण अपघातात लोणीतील चार जण जखमी झाले. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.

याबाबत लोणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लोणी बुद्रुक येथील हॉटेल साईछत्रचे संचालक शैलेश गणपत भोसले व त्यांचा गाडी चालक दादाभाई मणियार हे महेंद्रा बोलेरो (एमएच- 37 ए 3848) मधून तळेगाव रस्त्याने लोणीकडे येत होते. लोणी खुर्द गावच्या स्मशानभूमीजवळ लोणी बुद्रुक गावाकडे जाण्यासाठी त्यांनी गाडीचा वेग कमी केला आणि तेवढ्यात पाठीमागून हुंडाई कार (एमएच 17 एझेड) भरधाव वेगात येऊन बोलेरोवर धडकली.


कारचा वेग इतका होता की, बोलेरो गाडी उलटली आणि दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. सिनेमातील दृश्याप्रमाणे हा अपघात घडला. बोलेरोतील भोसले आणि मणियार यांना दरवाजाच्या काचा फोडून बाहेर काढण्यात आले तर कार मधील प्रा. सुधाकर निकम व त्यांचा मुलगा विवेक यांना बाहेर काढण्यासाठी ट्रॅक्टरची मदत घ्यावी लागली. निकम पिता-पुत्र जबर जखमी झाले. चारही जखमींना प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post