अवैध वाळू वाहतूक....अण्णा हजारे यांचा तालुक्याची बिहारसारखी परिस्थिती

 पारनेर तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक अजून किती जणांचा बळी घेणार?

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने प्रशासनाला निवेदनाद्वारे प्रश्‍न
अवैध वाळू वाहतूकीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी


अहमदनगर (प्रतिनिधी)- टाळेबंदीत पारनेर तालुक्यात अवैध वाळू व्यवसाय जोमात सुरु असून, या अवैध वाळू वाहतूकीत अपघात होऊन अनेक निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. नुकतेच खडकवाडी येथे एका व्यक्तीला वाळूच्या डंपरने उडवले असता तो जागीच ठार झाल्याची घटना घडली असून, अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने अवैध वाळू वाहतूक करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयात दिले.  
पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू व्यवसाय व त्याची वाहतूक सुरु आहे. यासंदर्भात अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने वेळोवेळी निवेदन देऊन संबंधीतांवर कारवाई करण्याचे निवेदन दिले होते. बुधवार दि.19 मे रोजी खडकवाडी येथे एका व्यक्तीचा अवैध वाळू वाहतूकीमध्ये बळी गेला आहे. यापुर्वी देखील सदर ठिकाणी तीन व्यक्तींचा अपघात होऊन मृत्यूमुखी पडले आहेत. अवैध वाळूचे ढंपर अत्यंत गतीने रस्त्यावर जात असतात. बेफामपणे सुरु असलेल्या या वाहतुकीमुळे अपघात होऊन अनेकांचा बळी जात आहे. या प्रकरणी आवाज उठवून देखील महसुल प्रशासनाचे वाळू तस्करांशी आर्थिक हितसंबंध असल्याने याकडे दुर्लक्ष करण्याचे आल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.  
अवैध वाळू वाहतूक अजून किती जणांचा बळी घेणार? आणि प्रशासन किती बळी जाण्याची वाट पहाणार? हा प्रश्‍न संघटनेच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. वाळू तस्करांमुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा तालुक्याची बिहारसारखी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. तातडीने अपघाताला कारणीभूत ठरणार्‍या अवैध वाळू वाहतूकीवर कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

1/Post a Comment/Comments

  1. या डंपरवर नंबर देखील नसतो आर टी ओ काय झोपा काढतात का?

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post