लिटिल मास्टर सुनील गावसकर यांनी केले होते वाडिया पार्क स्टेडियमचे उद्घाटन

 लिटिल मास्टर सुनील गावसकर यांनी केले होते वाडिया पार्क स्टेडियमचे उद्घाटन
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार व जागतिक कीर्तीचे महान फलंदाज श्री सुनिल गावसकर यांच्या हस्ते 1979 साली अहमदनगर येथील वाडिया पार्क स्टेडियमचे शानदार उद्घाटन करण्यात आले होते. स्टेडियम परिसरातील जवाहर स्टेडियम या कुस्तीच्या मैदानावर हा समारंभ पाहण्यासाठी नगरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळीं आम्ही  मित्र मित्र गावसकर यांना पाहण्यासाठी  गर्दीतून वाट काढीत पोहोचलो होतो. मी त्यावेळी 6 वी इयत्तेत असेल.

नगरपालिकेचे तत्कालीन नगराध्यक्ष स्व श्री नवनीतभाई बार्शीकर यांच्या प्रेरणेने बांधलेले वाडीयापार्क स्टेडियम पूढे अनेक वर्ष शहराच्या  क्रिडा संस्कृतीचे प्रमूख केंद्र बनले. भाई बार्शीकर यांनी या शहराचा विविध क्षेत्रात जो लोकाभिमुख विकास केला. या व्यक्तिमत्वाने आपल्या शहराला जो नवा विकासाचा चेहरा दिला तो आज देखील येथिल सर्वसामान्य माणूस विसरायला तयार नाही.

मध्यंतरी मी एका क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने वाडिया पार्क येथील जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयात गेलो असता या स्टेडियमचा थोडक्यात इतिहास  तत्कालीन जिल्हा क्रिडा अधिकारी यांना सांगितला.

त्यांना हेही अभिमानाने विनम्रतेने सांगितले, की हे आजचे जे अत्याधुनिक स्टेडियम पूर्णत्वास आले आहे. यामागील कल्पना माझी होती. मी त्यावेळीं पालिकेच्या क्रिडा व सांस्कृतिक समितीचा सभापती होतो. मा. नगराध्यक्षा सौ लता लोढा, सर्व सन्माननीय पदाधिकारी, मा.नगरसेवक यांच्या  योगदानामुळे व आम्ही सर्वांनी सौ. लता लोढा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये एकमताने ठराव करीत  वाडीया मैदान जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या जिल्हा क्रिडा समितीला शासनाच्या निधीतून अत्याधुनिक स्टेडियम निर्माण करण्यासाठी सुपूर्द केले.राज्याचे क्रीडा सचिव श्री. ठाकूर यांनाही आम्ही यासंदर्भात मैदानाच्या भेटीसाठी निमंत्रित केले होते.यामागची सर्वांची एकच भावना होती की,

अहमदनगरचे क्रिडा क्षेत्र या स्टेडियममुळे समृध्द व्हावे यातुन राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार व्हावेत.

 चर्चा करत असताना जिल्हा क्रिडा अधिकारी यांना मी विनंती केली, की स्टेडियमचे  79 साली श्री सुनिल गावसकर यांच्या हस्ते झालेल्या उद्घाटन समारंभाचे छायाचित्र आपल्या या कार्यालयात दिसेल अशा पद्धतीने लावावे. यामुळें कार्यालयात येणाऱ्या खेळाडूंना, क्रीडा रसिकांना याची माहिती होईल.  तुम्हीं म्हणाल तर या छायाचित्राची फ्रेम मी माझ्यातर्फे भेट देतो.

 यासंदर्भात आपणाशी नक्की संपर्क करेन असे त्यांनी सांगितले पण पुन्हा त्यांचा कधी फोनही आला नाही. अन् हे छायाचित्र कार्यालयांत लावण्याचा त्यांचा उत्साह कधी दिसला नाही. नंतर त्यांचीही बदली झाली.

ज्या दानशूर श्री. वाडिया यांनी इतकी मोठी जागा खेळासाठी दान दिली. ज्यामुळे क्रिकेट सहित अनेक खेळ शहरात जिवंत आहेत. म्हणूनच वाडिया यांचे नाव नगरकरांच्या  ह्रुदयात वसले आहे.

वाडीया,नवनीतभाई बार्शीकर , अनेक तत्कालीन पदाधिकारी आज हयात नाहीत.त्यांचे कर्तृत्व , दूरदृष्टी  शहराच्या विकासाला निश्चितपणे दिशा देणारे  होतें .त्यांचे हे  योगदान शहरवासीय कदापि विसरू शकणार नाहीत..

माननीय जिल्हा क्रिडा अधिकारी यांनी त्यांच्या व महापालिकेप्रती आपल्या मनात  कृतज्ञतेची भावना जपायला हवी.


जयंत येलुलकर, माजी नगरसेवक, अहमदनगर

12 मे 2021 /9822096961

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post