महिला सरपंच आल्या धावून...नगर तालुक्यातील 'हे' कोविड सेंटर बनलय रूग्णांसाठी वरदान

 .

महिला सरपंच आरती कडूस आल्या धावून...नगर तालुक्यातील सारोळा कासार  कोविड सेंटर बनलय रूग्णांसाठी वरदान   नगर:   कोरोनाचा शहरांसह गाव खेड्यांमध्ये हाहाःकार सुरू आहे आणि सामान्य जनता त्यात अक्षरशः होरपळून निघत आहे.  शहरांमध्ये केवळ टेस्ट साठी १००० ते २००० रुपये लागत आहेत आणि बेड व औषधोपचारासाठी ५०,००० रु. ची तयारी करून देखील बेड उपलब्ध होईल याची शाश्वती नाही. अश्या परिस्थितीत कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सारोळा कासार ग्रामस्थांनी मात्र आदर्शवत उपक्रम हाती घेतला आहे.

    येथील सरपंच सौ. आरती रविंद्र कडूस यांनी ग्रामपंचायत, आरोग्य विभाग आणि जय शंकर मित्र मंडळातील तरुण यांची एक टीम तयार करून सारोळ्यात ६० बेडचे 'गुरू शंकर टेस्टिंग अँड क्वारंटाईन सेंटर' सुरू केले आहे. त्या माध्यमातून त्यांनी 3-T (ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटिंग) फॉर्म्युलाचा अवलंब करून कोरोनाला हद्दपार करण्याचा संकल्प केला आहे.

   सुरुवात ट्रेसिंग आणि टेस्टिंग पासून केली, प्रशासनाच्या निर्देशानुसार ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी आणि आशा सेविका, जिल्हा परिषद शिक्षक यांचे ५ ग्रुप तयार करून गावातील प्रत्येक नागरिकाची घरी जाऊन प्राथमिक आरोग्य तपासणी केली. त्यामध्ये प्रत्येकाचे ऑक्सिजन सॅच्युरेशन आणि तापमानाची नोंद घेतली. ज्याला लक्षणे जाणवली त्याला लगेच टेस्ट करून विलगिकरणात राहण्याचा सल्ला दिला. एकीकडे ट्रेसिंग सुरू असताना दुसरीकडे त्याच सोबत रॅपिड टेस्टचा सपाटा लावला. सौ. आरती कडूस यांनी आरोग्य विभागाच्या मदतीने गावात जानेवारी पासून ९८० मोफत रॅपिड टेस्ट केल्या ज्यातील ६७८ तर गेल्या दीड महिन्यात केल्या. पॉझिटिव्ह रुग्णांना तत्परतेने औषधोपचारासाठी प्रवृत्त केले. रुग्णांची संख्या वाढू लागताच गावातील निर्बंध अधिक कडक केले.

    गंभीर रुग्णांसोबतच सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची औषधोपचारासाठी आणि विलगिकरणासाठी सुरू असलेली परवड पाहून सद्गुरू श्री. राजाभाऊ कोठारी यांच्या प्रेरणेतून जय शंकर मित्र मंडळ आणि ग्रामपंचायतीने दि. २२ एप्रिल रोजी 'संपूर्ण मोफत' क्वारंटाईन सेंटर' गावातच सुरू केले. ह्यासाठी गावातील अनेक लोक मदतीसाठी पुढे आले आहेत. सरपंच सौ. आरती कडूस, पं. स. सदस्य श्री. रविंद्र कडूस, श्री. जीवन हारदे, ऐश्वर्य मैड, श्री. नितीन साळवे, श्री. भूषण कडूस, डॉ.श्रीकांत देशपांडे, महेश कडूस, सुखदेव कडूस,साजन कडूस, विजय राहिंज, स्वामी धामणे, नानासाहेब पारधे, बब्बू इनामदार, सुभाष धामणे, श्यामराव कडूस, सागर कडूस ही मंडळी जीव धोक्यात घालून ह्या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून रुग्णसेवा करत आहेत. रुग्णांना केवळ विलगिकरणात ठेवायचे म्हणून न ठेवता त्यांना सात्विक आहार, आवश्यक औषधोपचार (फेविपीरावीर सह) येथे दिला जात आहे. रुग्णांची विशेष काळजी घेतली जात आहे.

   नगर येथील सुप्रसिद्ध केअर प्लस हॉस्पिटल च्या डॉ. सौ. प्राजक्ता पारधे (एम.डी. मेडिसिन) येथे मोफत रुग्णांची तपासणी करत आहेत. त्याचप्रमाणे डॉ. अतुल संचेती, डॉ. राहुल ठोकळ, CHO डॉ. सुविधा धामणे, डॉ. राहुल धामणे येथे दररोज रुग्ण तपासणी करत आहेत. सर्व अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका, सौ. गोडसे, वाबळे, मिजबा इनामदार ह्या ठिकाणी मोफत रुग्णसेवा करत आहेत. गावात सुरू असलेले प्रामाणिक प्रयत्न पाहून अनेक मान्यवर नागरिक पुढे येत आहेत आणि गुरू शंकर क्वारंटाईन सेंटर ला भरभरून देणगी देत आहेत. ज्यामुळे रुग्णांना जास्तीत जास्त चांगली सेवा देणे शक्य होत आहे. 

   येथील व्यवस्था पाहून आणि आजारातून ठणठणीत बरे होण्यासाठी एक रुपयाही खर्च येत नसल्याने सारोळा कासार सह घोसपुरी, अकोळनेर, बाबूर्डी, घोडकेवाडी येथील रुग्णही सेंटरमध्ये दाखल होत आहेत. बाधित रुग्ण आता घरी न थांबता सेंटर मध्ये दाखल होत आहेत. टेस्टिंग साठी स्वतःहून पुढे येत आहेत. याचा परिणाम असा की, दिवसागणिक गावातील रुग्णसंख्येत कमालीची घट होत आहे. गट विकास अधिकारी श्री. घाडगे आणि विस्ताराधिकारी श्री. माने यांनी सेंटर ला भेट देऊन ग्रामस्थांचे सुरू असलेल्या उपक्रमासाठी कौतुक केले आहे.

    कोरोना समिती अध्यक्ष म्हणून सरपंच सौ. आरती कडूस, ग्रामसेवक श्री. कसबे, तलाठी श्री. भोगे, पर्यवेक्षक आत्माराम धामणे, ग्रामपंचायत कर्मचारी श्री. राहिंज, श्री. महंमद तांबोळी, श्री. शेख तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री. भिटे सर, सुपर वायझर श्री. कोकाटे सर यांच्यासह जिल्हा परिषद शिक्षक आणि माध्यमिक शिक्षक येथे व्यवस्थापनात मदत करत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post