रेमडेसिवीर इंजेक्शनची काळ्या बाजारात चढ्या भावाने विक्री, तिघांना अटक


रेमडेसिवीर इंजेक्शनची काळ्या बाजारात चढ्या भावाने विक्री, तिघांना अटक नगर :  कोरोनाबाधित रूग्णावर उपचारादरम्यान वापरण्यात येणार्‍या रेमडेसिवीर इंजेक्शनची काळ्या बाजारात चढ्या भावाने विक्री करणार्‍या तीन आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. आरोपींकडून सात लाख 32 हजार 850 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 


हेमंत दत्तात्रय कोहोक (वय 21, रा. बोल्हेगाव, अहमदनगर), भागवत मधुकर बुधवंत (वय 20, रा. आदर्श कॉलनी, बोल्हेगाव) आणि आदित्य बाबासाहेब म्हस्के (वय 21, रा. माताजीनगर, एमआयडीसी, अ.नगर) अशी पोलिसांनी अटक केलेल्या तीन आरोपींची नावे आहेत. आरोपी हेमंत कोहोक याला सोमवारी सकाळी न्यायालयासमोर हजर केले असता त्याला गुरूवार दि. 6 मे पर्यत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.आरोपींना इंजेक्शन पुरवणारे चौघे फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.


नगर शहरातील बालिकाश्रम रोड व एमआयडीसी परिसरात रेमडेसिवीर इंजेक्शनची चढ्या भावाने विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यानुसार पोनि. कटके यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सपोनि. दिवटे यांनी औषध निरीक्षक विवेक खेडकर यांना कारवाईकामी स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात बोलावून घेतले. त्यानंतर कारवाईचे नियोजन करून आरोपी हेमंत कोहोक याला फोन करून बनावट ग्राहकाच्या मदतीने संपर्क करून इंजेक्शनबाबत विचारपूस केली असता आरोपी कोहोक याने इंजेक्शनची किंमत 27 हजार सांगितली. आरोपी कोहोक याला इंजेक्शन खरेदीबाबत होकार दिला असता त्याने बालिकाश्रम रोड येथे बोलावले. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून आरोपी कोहोक याला ताब्यात घेतले. आरोपीकडून पॉलीफार्मा कंपनीचे एक रेमडेसिवीर इंजेक्शन, मोबाईल आणि स्कॉर्पिओ कार असा सात लाख 12 हजार 400 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यासंदर्भात तोफखाना पोलिस ठाण्यात औषध निरीक्षक विवेक खेडकर यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक सोळंके हे करत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post