गावांमध्ये दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर जेरबंद


गावांमध्ये दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर जेरबंदनगर:  राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथे मागील काही दिवसांपासून दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर काल मंगळवारी रात्री एक वाजेच्या सुमारास पिंजर्‍यात जेरबंद झाला.

पाथरे बुद्रुक-कोल्हार रोडलगत मळहद शिवारात मागील काही दिवसांपासून बिबट्याचा संचार होता. दोन दिवसांपूर्वी येथील अशोक पोपट घोलप यांच्या वस्तीवर रात्री 10 वाजता सर्व घरासमोर बसलेले असताना बिबट्याने कुत्र्याची शिकार केली. तसेच येथील रावसाहेब सखाराम घोलप यांच्या मालकीच्या शेळीला बिबट्याने फस्त केले. यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले.


पाथरे बुद्रुकचे सरपंच उमेश घोलप तसेच प्राणीमित्र विकास म्हस्के यांनी वनविभागाचे अधिकारी श्री. सुरासे यांच्याशी संपर्क साधला. बिबट्याच्या दहशतीबद्दल माहिती दिली. त्यावरून रितसर पंचनामा करण्यात आला. ग्रामस्थांच्या मागणीनुसार रावसाहेब घोलप यांच्या वस्तीवर पिंजरा लावण्यात आला. अखेर काल मंगळवार दि. 4 मे रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास हा बिबट्या पिंजर्‍यात अडकला. आणि पाथरे बुद्रुक मळहद शिवारातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post