प्राथमिक शिक्षकांची संवेदनशीलता...करोना रुग्णांसाठी दिले १ कोटींचे योगदान

 

कठीण समय येता शिक्षकच कामास येतात...नगर जिल्ह्यातील गुरूजींनी लोकांच्या आरोग्यासाठी दिले तब्बल १ कोटींचे योगदाननगर : भौगोलिकदृष्ट्या नगर जिल्हा राज्यात सर्वात मोठा असून जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकही सर्वात जास्त आहेत.  या शिक्षकांच्या संघटनांमधील वाद व राजकारण राज्यात चर्चेत असते. पण आताच्या करोना संकटात समाज घडवणारे शिक्षक समाजाच्या आरोग्यासाठी धावून आल्याचं सकारात्मक चित्र पहायला मिळत आहे. एकीकडे ऑनलाईन पद्धतीने मुलांना शिक्षण प्रवाहात टिकवून ठेवणे आणि त्याचवेळी सरकारी आदेशानुसार लॉकडाऊनमध्ये कोविड प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वेक्षणापासून ते तपासणी नाक्यावरही शिक्षक ड्युटी बजावत आहेत. पण एवढ्यावरच न थांबता शिक्षकांनी एकत्र येत गावोगावी सुरू असलेल्या आरोग्याच्या कामात स्वयंस्फूर्तीने तब्बल १ कोटी रुपयांचे योगदान देत लोकांचं आरोग्य जपण्यासाठी धडपड चालवली आहे.

गेल्या वर्षाहून अधिक काळ सुरू असलेल्या करोना प्रादुर्भावाच्या काळात शाळा बंद असल्याने प्राथमिक शिक्षक करतात काय, त्यांना काय काम आहे, असा प्रश्न उपस्थित केला केला जातो. त्यांना मिळणार्या गलेलठ्ठ पगाराचीही नकारात्मक चर्चा होत असते. परंतु,  करोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्याच्या विविध भागांतील शिक्षकांनी एकत्र येत आपल्या गावात, तालुक्यात उपचार सुविधा निर्माण करण्यावर भर दिला आहे. 

 जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक संघ (सदिच्छा आणि गुरुमाऊली मंडळ), प्राथमिक शिक्षण समिती (गुरुकुल मंडळ), अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ (ऐक्य मंडळ), बहुजन शिक्षण संघ (इब्टा) अशा पाच-सहा प्रमुख संघटना व त्यांची मंडळे आहेत. या संघटनांची समन्वय समितीही आहे.  या समितीने आताच्या संकटात शिक्षकांच्या प्रश्नाऐवजी समाजाच्या आरोग्याचा प्रश्न अजेंड्यावर आणला व प्रत्यक्षात कृती केली.त्यांनी करोनाग्रस्तांवरील उपचार सुविधा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला. तालुक्यातील प्रशासनाशी समन्वय साधत ठेवत ‘करोना केअर सेंटर’उभारणे, तेथे प्राणवायू सुविधा निर्माण करणे, कोविड सेंटरपर्यंत बाधितांना पोहोचवणे, औषधोपचार साहित्य, विलगीकरणातील बाधितांना जेवण पोहोचवणे यासारख्या अनेक सेवाकार्यात शिक्षकांनी एकत्र येत पुढाकार घेतला आहे.

अकोलेसारख्या आदिवासी आणि दुर्गम तालुक्यात  प्राथमिक शिक्षकांना माध्यमिक शिक्षक आणि प्राध्यापकांकडूनही सहकार्य मिळाले. अकोल्यात ३२ लाख, संगमनेरमध्ये १५ लाख, राहुरी ७ लाख, शेवगावमध्ये ५.५०, पाथर्डीत ५, नेवासे ६ लाख २५ हजार, जामखेडमध्ये २ लाख पारनेरमध्ये ६ लाख ६० हजार, श्रीरामपूर मध्ये ३ लाख ५० हजार, राहत्यात ४ लाख २५ हजार, नगर तालुक्यात २ लाख, कर्जत ३ लाख, श्रीगोंद्यात ४ लाख, कोपरगाव १ लाख २५ हजार, उर्दू माध्यमातील शिक्षकांनी सुमारे ४ लाख रुपयांचा निधी संकलित करून तेथील लोकप्रतिनिधी, तालुका प्रशासनाकडे रोख अथवा साहित्य स्वरूपात सुपूर्द केला. याशिवाय शिक्षक बँकेनेही ७ लाखांचा निधी दिला आहे.

अकोले येथील उपक्रमशील शिक्षक भाऊसाहेब चासकर म्हणाले की,  आपत्तीमध्ये यंत्रणा कोसळत असताना सरकारी शाळांतील शिक्षक दातृत्वाच्या नव्हे तर कर्तव्याच्या भावनेतून पुढे आले आहेत. 


शिक्षक नेते संजय कळमकर यांनी सांगितले की,  कोविड केअर सेंटर आणि इतर वैद्यकीय सुविधांसाठी मदत केली. यातूनच आता पुढे प्राथमिक शिक्षकांचे मोठे रुग्णालय का असू नये, अशी कल्पना पुढे आली आहे. शिक्षक बँक व विकास मंडळ या माध्यमातून शिक्षकांचे रुग्णालयसुद्धा उभे राहू शकते.

बापूसाहेब तांबे यांनी सांगितले की, करोना संकटात समाजाला मदत व्हावी म्हणून जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी आपले संघटनात्मक मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने एक कोटीपेक्षा जास्त रकमेची मदत केली आहे. मुख्यमंत्री निधीलाही जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक एक दिवसाचे वेतन देणार आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post