कुबेर यांच्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह मजकूर, खा.अमोल कोल्हे यांनी केली 'ही' मागणी

 कुबेर यांच्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयीचा आक्षेपार्ह मजकूर, खा.अमोल कोल्हे यांनी केली मजकूर वगळण्याची मागणीमुंबई: ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकावरून वाद सुरू झाला आहे. या पुस्तकात आक्षेपार्ह मजकूर छापून कुबेर यांना नेमकं काय साध्य करायचं आहे? असा आक्रमक सवाल राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि संभाजी बिग्रेडने केला आहे. 

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विट करून आणि कुबेर यांना पत्रं लिहून पुस्तकातील वादग्रस्त मजकूर वगळण्याची मागणी केली आहे. कुबेर यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या “Renaissance State: The Unwritten Story of the Making of Maharashtra” या पुस्तकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयीचा आक्षेपार्ह मजकूर समाज माध्यमांद्वारे माझ्या वाचनात आला. मी अद्याप हे संपूर्ण पुस्तक वाचले नाही. तथापि या पुस्तकातील काही पाने माझ्या वाचण्यात आली आहेत. त्यामध्ये नमूद उल्लेख काळजीपूर्वक वाचला. कुबेर यांचा अर्थकारण, परराष्ट्रधोरण, विशेषतः रशियाचे राजकारण यासंबंधीचा व्यासंग पाहता त्यांनी यासंदर्भात केलेले हे उल्लेख वाचून सखेद आश्चर्य वाटले. कुणा परदेशी लेखकाची ऐकीव माहिती किंवा मुघल इतिहासकारांनी केलेल्या उल्लेखांवर आधारित ऐतिहासिक लिखाण करणे, एकांगी व तथ्यहीन असेल ही बाब कदाचित कुबेर यांच्या लक्षात आली नसावी, असं राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याच्या विरोधात कटकारस्थान करणाऱ्या कारभाऱ्यांना हत्तीच्या पायी दिल्यानंतर देखील महाराणी सोयराबाई जिवंत होत्या. हे दाखवणारी अनेक साधने व पुरावे उपलब्ध आहेत. तीच बाब बुऱ्हाणपूर मोहिमेसंदर्भात आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील “स्वराज्यरक्षक संभाजी” मालिका करताना मी हे पदोपदी अनुभवले आहे. त्याचप्रमाणे अशा विधानांचा आधार घेऊन भविष्यात पुन्हा बदनामीचे षडयंत्र रचले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून माझी संबंधित लेखक व प्रकाशकांना विनंती आहे की, शिवशंभू प्रेमींच्या भावनांचा आदर करून आणि सत्याची कास धरून सदर आक्षेपार्ह विधाने वगळण्यात यावीत. लेखकाच्या लेखन स्वातंत्र्याविषयी जो आदर आहे, त्यास तडा जाऊ देऊ नये ही विनंती, असं खासदार कोल्हे यांनी म्हटलं आहे.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post