आदर्श गाव हिवरेबाजारच्या करोना मुक्तीची यशोगाथा... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली दखल

 

*अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रधानमंत्र्यांना सांगितली हिवरेबाजारच्या करोनामुक्तीची यशकथा*


*अहमदनगरच्या करोना प्रतिबंधक कामाची खुद्द प्रधानमंत्र्यांनी घेतली दखल!*मुंबई दिनांक २०:  हिवरेबाजारने गावात आरोग्य  व स्वयंसेवकाच्या ४ टिम स्थापन करून गावातील प्रत्येक घराचा सर्व्हे केला. करोना लक्षण आढळणाऱ्या प्रत्येक रुग्णाच्या घराची आणि कुटुंबाची जबाबदारी या टीमने घेऊन रुग्णांना विलगीकरण कक्षात दाखल होण्यास प्रोत्साहित केले त्यामुळे रुग्णांची आता आपल्या घराचे आणि कुटुंबाचे काय होणार, शेतीभाती आणि दुध दुभत्याच्या कामाचे काय होणार ही काळजी मिटली. ज्यांचा सुरुवातीला विलगीकरणात जाऊन उपचाराला विरोध होता ते या प्रयत्नामुळे विलगीकरणात राहून उपचार घेण्यास तयार झाले.  यातूनच करोनामुक्त  हिवरेबाजारची वाटचाल सोपी होऊन गाव काही कालावधीतच करोनामुक्त झाल्याची माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दिली व हिवरेबाजारचा हा करोनामुक्तीचा  पॅटर्न पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील १३१६ ग्रामपंचायतींमध्ये राबविला जात असल्याचे सांगितले.


*प्रधानमंत्र्यांनी जाणून घेतल्या यशकथा*

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ११ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या राज्यातील ६० जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून संवाद साधला. ज्या जिल्ह्यांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित जिल्ह्यातील करोना रुग्ण वाढीवर नियंत्रण मिळवले, त्या काही जिल्ह्यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती प्रधानमंत्र्यांनी समजून घेतली तसेच स्थानिक पातळीवर प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या या सर्व अधिकाऱ्यांची प्रयत्नांची आणि अनुभवाची ही शिदोरी  पुढील कित्येक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याने याच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या जाव्यात, जिल्ह्याच्या ज्या गावात करोनाचा प्रादुर्भाव झाला नाही तिथे तो होणार नाही आणि जिथे झाला आहे तिथे कडक उपाययोजनांद्वारे तो नियंत्रित करून जिल्ह्यातील गावे करोनामुक्त होतील यादृष्टीने प्रयत्न करावेत  अशा सूचनाही श्री. मोदी यांनी यावेळी केल्या. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी तिसऱ्या लाटेत युवक आणि बालकांना करोना लागण होण्याची शक्यता विचारात घेऊन बालरोग तज्ज्ञांची टीम तयार करण्यात यावी, बालकांच्या मापाचे छोटे ऑक्सीजन मास्क तयार ठेवावेत, करोनामुक्तीसाठी जनजागृती वाढून करोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, लसीचा एकही डोस वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी अशा काही सुचनाही यावेळी केल्या.


या व्हिडिओ कॉन्फरंसिंगमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृह मंत्री अमित शहा  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह,  गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव,आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे,   मदत आणि पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव  आसिम गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, वैद्यकीय शिक्षण सचिव  सौरभ विजय,  पोलीस  महासंचालक संजय पांडे यांच्यासह  केंद्र आणि राज्य शासनाचे अधिकारी सहभागी झाले होते.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post